युवकांनो... ऑनलाइन जोडीदार शोधताना सावधान, हात पिवळे होण्याआधीच होईल तुमचा खिसा रिकामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:37 AM2021-09-16T04:37:28+5:302021-09-16T04:37:28+5:30
जालना : सध्या ऑनलाइन वधू-वर शोधण्यावर अनेकांनी भर दिला आहे. परंतु, ऑनलाइन वधू-वर शोधताना आपण दिलेल्या माहितीचा वापर करून ...
जालना : सध्या ऑनलाइन वधू-वर शोधण्यावर अनेकांनी भर दिला आहे. परंतु, ऑनलाइन वधू-वर शोधताना आपण दिलेल्या माहितीचा वापर करून वधू-वर मिळण्यापूर्वीच आपले बँक खाते रिकामे होण्याची शक्यता वाढली आहे.
वधू-वर शोधण्याच्या प्रयत्नात ऑनलाइन फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार राज्यात घडले आहेत. वधू- वर शोधताना केलेला निष्काळजीपणा अनेकांचे बँक खाते रिकामे करून गेला आहे. त्यामुळे युवक- युवतींनी वधू-वर शोधताना आपली खासगी माहिती, बँक खात्याची माहिती समोरील व्यक्तीला देऊ नये.
ही घ्या काळजी
ऑनलाइन वधू-वर शोधताना वेबसाईटच्या विश्वासार्हतेची माहिती घ्यावी आणि माहिती भरताना नवीन ई-मेलचा वापर करावा.
वेबसाईटवर माहिती भरताना तुमचे बँक खाते आणि त्याच्याशी लिंक माहिती भरू नये.
वेबसाईट चालक बोलतोय असे सांगून कोणी फोन केला तर बँक खात्याची माहिती किंवा ओटीपी देऊ नयेत.
अशा प्रकारे होऊ शकते तुमची फसवणूक
वधू-वर सूचक वेबसाईटवरून संपर्क केला जातो. फेसबुक, व्हाॅट्सॲप चॅटिंग करून विविध आमिष दाखविले जातात. महागडी गिफ्ट पाठवून कराच्या नावाखाली आर्थिक लूट होऊ शकते.
काही वेळा एखादी लिंक पाठवून ती डाऊनलोड करण्यास सांगितले जाते किंवा माहिती भरण्यास सांगितली जाते. आपण लिंक डाऊनलोड केली किंवा बँकेची माहिती भरली तर तत्काळ बँक खाते रिकामे होते.
ऑनलाइन व्यवहारात दक्षता महत्त्वाची
केवळ वधू-वर शोधाच्या वेबसाईटच नव्हे तर, इतर विविध माध्यमातून अनेकांची ऑनलाइन फसवणूक होत आहे. अनेकजण स्वत:हून बँक खात्याची माहिती देण्यासह ओटीपी देत असल्याचे प्रकारही समोर आले आहेत. त्यामुळे वधू-वर शोधणे असो किंवा इतर कोणतेही व्यवहार असोत ते काळजीपूर्वक करावेत. बँक खात्याची माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नये. -सपोनि. कीर्ती पाटील, सायबर सेल, जालना