लोकशाहीसाठी तरुणांनी मतदानात सहभाग नोंदवावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 12:44 AM2018-01-26T00:44:48+5:302018-01-26T00:45:16+5:30
तरुण व नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजावून एक सार्वभौम, शक्तिशाली लोकशाही राष्ट्र उभारणीस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी गुरुवारी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : तरुण व नवमतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणात वेळीच मतदार नोंदणी करुन लोकशाही सुदृढ व सक्षम करण्यासाठी हातभार लावावा. तसेच मतदानाचा हक्क बजावून एक सार्वभौम, शक्तिशाली लोकशाही राष्ट्र उभारणीस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी गुरुवारी येथे केले.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
व्यासपीठावर पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अपर जिल्हाधिकारी प्रकाश खपले, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजेश जोशी, राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, तहसीलदार बिपीन पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जोंधळे म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० या दिवशी झाल्याने हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. मतदारांमध्ये जागृती निर्माण व्हावी हा मतदार दिन साजरा करण्यामागे मुख्य हेतू आहे.
पोलीस अधीक्षक पोकळे म्हणाले की, तरुणांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन समृद्ध व सशक्त अशा लोकशाहीचा पाया अधिक मजबूत करावा.
यावेळी आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेतील रौप्यपदक विजेते किशोर डांगे पोलीस दलातील कर्मचारी यांना तरुणांसाठी प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व म्हणून विशेष निमंत्रित करण्यात आले होते. प्रास्ताविक राजेश जोशी यांनी केले.
जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी, चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.