ओबीसींच्या मागण्यांसाठी युवकांसह युवती आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:32 AM2021-01-25T04:32:23+5:302021-01-25T04:32:23+5:30
जालना : ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, यासह इतर अनेक मागण्या मोर्चात सहभागी युवक, ...
जालना : ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, यासह इतर अनेक मागण्या मोर्चात सहभागी युवक, युवतींनी केल्या. ओबीसींच्या न्याय्य मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा सुरू राहणार असल्याचा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला.
ओबीसी समाजाच्या अनेक न्याय्य मागण्या शासनदरबारी प्रलंबित आहेत. या न्याय मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आजचा मोर्चा काढण्यात आला आहे. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आमचा हा लढा सुरू राहणार आहे.
तेजेस कुलवंत
नेर
ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे. शिवाय ओबीसी प्रवर्गातील नागरिक, युवकांसाठी अधिकाधिक कल्याणकारी योजना राबवून त्यांच्या समाजिक, आर्थिक उन्नतीसाठी शासनाने मदतीचे धोरण राबविणे गरजेचे आहे.
डॉ. प्रदीप पंडित
जालना
आरक्षणाच्या न्याय्य मागणीसाठी आम्ही गत अनेक वर्षांपासून लढा देत आहोत. मात्र, शासन आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. आमच्या न्याय्य मागण्यांसाठी आजचा हा मोर्चा होता. मागण्या मान्य न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलने उभी केली जातील.
गणेश जायभाये
निमगाव, ता. देऊळगावराजा
ओबीसी समाजाची सामाजिक, आर्थिक स्थिती अपेक्षितरित्या प्रगत नाही. त्यामुळे शासनाने ओबीसींच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात. समाजासाठी विशेषत: युवकांसाठी कल्याणकारी योजना राबिवण्याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
रघुनाथ खैरे
बदनापूर
ओबीसी समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. विशेषत: जातीनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे. ओबीसींमधील महिला, मुलींसाठीही विविध कल्याणकारी योजना राबिवणे गरजेचे आहे, जणेेकरून महिला, मुली सक्षम होण्यास मदत होईल.
वैष्णवी बांगर
नालेवाडी, अंबड
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५२मध्ये जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती. केंद्र शासनाने ओबीसींची जनगणना करून त्यांच्या हक्काचे संवैधानिक आरक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी हा मोर्चा असून, मागणी मान्य होईपर्यंत हा लढा सुरू राहणार आहे.
डॉ. प्रल्हाद लुलेकर
औरंगाबाद