‘गझल’चा वारसा तरूण पिढी समर्थपणे जपतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:33 AM2019-09-18T00:33:21+5:302019-09-18T00:34:12+5:30
तरूण पिढी ताकदीचे गझल लेखन करून गझल वारसा समर्थपणे जपत आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध गझलकार दास पाटील यांनी मंगळवारी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कवी सुरेश भटानंतर शिथिलता आलेल्या ‘गझल’ची सोशल मीडियामुळे व्यापकता वाढली असून, तरूण पिढी ताकदीचे गझल लेखन करून गझल वारसा समर्थपणे जपत आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध गझलकार दास पाटील यांनी मंगळवारी केले.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मंगळवारी भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषद शाखा जालना आणि जेईएस महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गझल कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ‘ते’ बोलत होते.
यावेळी उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉ. जवाहर काबरा हे उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राव साहेब ढवळे, प्रसिद्ध गझलकार मसूद पटेल, चित्रपट कथा लेखक चेतन सैंदाने, डॉ. राज रणधीर, डॉ. पंडित रानोमाळ, डॉ. के. जी. सोनकांबळे आदींची उपस्थिती होती.
पाटील म्हणाले, गझल, काव्यातून क्रांती घडवून आणली जाते, हे इतिहास दर्शवितो. गझल ही आपल्या जीवनाशी निगडित असते. गझलमुळे जीवन व्यापक होते. व्याकरण आणि तंत्र सांभाळून गझल लेखन करायला पाहिजे, शिवाय गझल लेखन करताना आशय, अचूकता व प्रभावीरीत्या विषयाची मांडणी करणे गरजेचे आहे. सोशल मीडियामुळे गझल लोकप्रिय होत आहे. नवीन पिढीतील गझलकार ताकदीचे गझल लेखन करताना दिसत आहेत. इंद्रजित उगले, अजय त्रिभुवन, सुरेश यलगुडे, सांबरे आदी गझलकार ताकदीचे गझल लेखन करीत आहेत.
गझलकार मसूद पटेल यांनी गझल ही अर्थपूर्ण आणि प्रभावी असावी, असे सांगून गझलचा वारसा समर्थपणे जपण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे, असे आवाहन केले.
प्रारंभी प्राचार्य डॉ. जवाहर काबरा यांच्या हस्ते वृक्ष जलदान करून या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. संशोधन परिषद शाखेचे सचिव डॉ. पंडित रानमाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.