तुमचे कर्ज झाले माफ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:18 AM2017-12-12T00:18:21+5:302017-12-12T00:18:28+5:30
आपल्या खात्यावरील कर्जाची रक्कम माफ करण्यात आली आहे’, असे संदेश शेतक-यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर प्राप्त होत आहेत.
जालना : ‘महाराष्ट्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत निकषांच्या आधारे बँकेतील आपल्या खात्यावरील कर्जाची रक्कम माफ करण्यात आली आहे’, असे संदेश शेतक-यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर प्राप्त होत आहेत. जिल्ह्यातील एक लाख २२ हजार ६१ शेतक-यांचे ६५७ कोटी ३० लाख, ५१ हजार शेतक-यांचे कर्ज आतापर्यंत माफ करण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्जदार असलेल्या २७ हजार ७३९ शेतक-यांचा यात समावेश आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत विविध राष्ट्रीयीकृत व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्जदार असलेल्या शेतक-यांना आता कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील तीन लाख ९७ हजार शेतकºयांनी कर्जमाफी मिळावी यासाठी आपले सरकार वेबपोर्टलवर आॅनलाइन नोंदणी केली होती. तर राष्ट्रीयीकृत बँकांनी आपल्या थकित कर्जदार असलेल्या तीन लाख १२ हजार शेतक-यांची माहिती आॅनलाइन अपडेट केली होती. सुरुवातीलच्या टप्प्यात कर्जमाफीची प्रक्रिया बराच काळ रेंगाळल्यामुळे कर्जमाफी कधी मिळेल, याची चिंता शेतक-यांना लागून होती. परंतु आता कर्जमाफीची रक्कम शेतक-यांच्या कर्जखात्यात जमा झाल्याचे संदेश प्राप्त होत आहेत. पहिल्या टप्प्यातील ग्रीन यादीत सहा हजार १५५ शेतक-यांना ५१ कोटी ४६ लाख ११ हजार, दुस-या ग्रीन यादीमध्ये ६५ हजार ७४९ शेतक-यांना ४०९ कोटी ८२ लाख आणि तिसºया ग्रीन यादीत ५० हजार १५७ शेतक-यांसाठी १९६ कोटी दोन लाख चार हजार रुपये विविध राष्ट्रीयीकृत बँकांना प्राप्त झाले आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांचे खातेदार असलेल्या ९४ हजार ३२२ शेतक-यांना ६२६ कोटी १५ लाख ५१ हजार रुपये तर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २७ हजार ७३९ शेतक-यांना ३१ कोटी १५ लाख रुपये प्राप्त झाले आहेत.
दरम्यान, कुंभार पिंपळगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेअंतर्गत २१४३ पैकी ७६४ खातेदारांचे ६ कोटी ८० लाख रक्कम कर्ज खातेदाराच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती शाखा व्यवस्थापक जी.पी.गायकवाड यांनी दिली. बँकेच्या पहिल्या टप्प्यात १०६ खातेदारांना १ कोटी ७ लाख तर दुस-या टप्प्यात ५६४ खातेदारांचे ५ कोटी ७३ लाख रक्कम कर्ज खात्यात जमा करण्यात आली तर तिस-या टप्प्यात येत्या दोन दिवसांत रक्कम खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.