तुमची तूर निकषात नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 12:55 AM2018-05-05T00:55:39+5:302018-05-05T00:55:39+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू असलेल्या नाफेडच्या हमीभाव केंद्रावर ग्रेडरने मनमानी कारभार सुरू केला आहे. क्लीनिंगच्या निकषात तुमची तूर बसत नाही, अशी थातूरमातूर कारणे दिली जात असून, आर्थिक लूट केली जात असल्याची तक्रार तूर उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू असलेल्या नाफेडच्या हमीभाव केंद्रावर ग्रेडरने मनमानी कारभार सुरू केला आहे. क्लीनिंगच्या निकषात तुमची तूर बसत नाही, अशी थातूरमातूर कारणे दिली जात असून, आर्थिक लूट केली जात असल्याची तक्रार तूर उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
गेल्या वर्षी तूर खरेदीत उडालेला गोंधळ आणि वेअर हाऊसच्या क्षमतेपेंक्षा जिल्ह्यात झालेली तूर खरेदी यामुळे नाफेडने आधीपासूनच हमीभावाने तूर खरेदीबाबत विविध कडक निकष लावले आहेत. त्यामुळे शेतमालातील आर्द्रता, काडीकचरा, किडीचे प्रमाण आदी निकष लावले आहे. याची बारकाईने तपासणी करण्यासाठी हमीभाव केंद्रावर ग्रेडरची नियुक्ती केली आहे. मात्र शेतक-यांचा शेतमाल निकषात बसत नसल्याचे शेतक-यांना सांगण्यात येत आहे. मालाची क्लिनिंग करूनच माल विक्रीस आणण्याचे फर्मान ग्रेडर सोडत आहे. मात्र, मध्यस्थीच्या मार्फत शेतक-यांना गाठून प्रति क्विंटल २०० रूपये याप्रमाणे दिल्यास तूर विक्री करून देत असल्याचे प्रकार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमीभाव केंद्रावर सुरू असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. दुस-या टप्यातील तूर खरेदीची १५ मे मुदत आहे. आॅनलाईन नोंदणी केलेल्या शेतक-यांपैकी आतापर्यंत साडेचार हजार शेतकºयांची तूर खरेदी करण्यात आली आहे. उर्वरित शेतक-यांची तूर विक्री बाकी आहे. परिणामी तूर विक्रीसाठी शेतक-यांची लगबग सुरू असताना ग्रेडरच्या ताठर भूमिकेमुळे शेतक-यांची कोंडी झाली आहे.