युवक-युवतींनी समाज, कुटुंबाप्रती संवेदनशील राहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 01:06 AM2020-01-05T01:06:53+5:302020-01-05T01:07:38+5:30
समाज, कुटुंबाप्रती युवकांनी संवेदनशील रहावे, असा सूर शहरात आयोजित अग्र- महाकुंभमधील चर्चासत्रात सहभागी वक्त्यांमधून निघाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आजच्या युवकांकडे इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे. परंतु, कम्युनिकेशन (आपापसातील संवाद) हरपत चालला आहे. ‘आपण आणि आपले बरे’, असे म्हणणाऱ्यांची संख्या वाढत आहे. हे कुठे तरी थांबविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. तसेच समाज, कुटुंबाप्रती युवकांनी संवेदनशील रहावे, असा सूर शहरात आयोजित अग्र- महाकुंभमधील चर्चासत्रात सहभागी वक्त्यांमधून निघाला.
दानकँुवर महाविद्यालयातील प्रांगणात अग्रवाल समाजाचे २४ वे प्रांतीय संमेलन अर्थात अग्र- महाकुंभ आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवारी सकाळी ज्येष्ठ पदाधिकारी विजय चौधरी, महामंत्री गोपाल अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यानिमित्त आयोजित ‘युवा चेतना’ या चर्चासत्रात छत्तीसगड येथील प्रसिध्द वक्ते हरीश मंत्री आणि पुणे येथील द्वारकाप्रसाद जालान यांनी विचार मांडले. युवकांनी समाजाप्रती संवेदना ठेवली पाहिजे. समाजाचे आणि कुटुंबाचे आपण घटक असल्याने त्यांचा विचार होणे गरजेचे आहे. आज माणसाकडे स्वत:साठी वेळ आहे. परंतु, समाजासाठी वेळ खर्ची करण्यास आजचा युवक धजावत नाही.
एकूणच आज संपर्काची अनेक साधने उपलब्ध असली तरी आपल्या मनात दडलेले दु:ख हे कोणाजवळ व्यक्त करावे, अशी विश्वासू व्यक्ती सापडत नाही. त्यामुळे वडील, मुलगा, नोकर हे देखील एक चांगले मित्र होऊ शकतात. ज्यांच्या जवळ तुम्ही तुमच्या भाव-भावना आणि दु:ख व्यक्त करू शकता. आयुष्यात काही मिळविण्याच्या नादात जगणं विसरत चाललो आहोत. याचे भान कुणालाही नाही. त्यामुळेच जे जीवन मिळाले आहे ते जास्तीत जास्त आनंदाने कसे जगता येईल, याचा विचार करणे गरजेचे आहे.
आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे
यावेळी मंत्री यांनी सांगितले की, आपल्याजवळ जे काही आहे, त्या पलीकडेही मोठे जग आहे. त्याकडे लक्ष वेधताना आयुष्याकडे बघताना सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे, त्यासाठी दृष्टीकोन बदलणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार तथा अग्रवाल प्रांतीय समाजाचे अध्यक्ष किरण अग्रवाल यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुभाष देविदान, उद्योजक घनशाम गोयल, दिनेश भारूका, सरिता बगडिया, पुरूषोत्तम जयपुरिया, संजय अग्रवाल, जितेंद्र अग्रवाल, डॉ. अनिता तवरावाला, संदीप गिंदोडिया, मनिष तवरावाला हे प्रयत्न करत आहेत.
संमेलनात आज अनेक ठराव
जालना येथे २४ वे अग्रवाल संमेलन भरविण्यामागचा उद्देश सकारात्मक दृष्टीकोन वाढविणे आणि ज्या काही समाजामध्ये अनिष्ट प्रथा, रूढी आहेत, त्यांना तिलांजली देऊन नवीन समाज निर्मिती करण्यासाठी रविवारी या संमेलनात विविध ठराव संमत करण्यात येणार आहेत.