युवकांनी बौद्धिक संपदा वाढविण्यावर भर द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 12:50 AM2018-01-13T00:50:34+5:302018-01-13T00:50:49+5:30
शेतीतील अवलंबित्व कमी करुन समाजातील युवकांनी बौद्धिक संपदा वाढण्यिावर भर देण्याची गरज आहे. आजचे युग हे स्पर्धेचे आहे. युवकांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करीत गुणवत्तेच्या आधारे वेगळे अस्तित्व निर्माण करावे, असे मत तंजावर संस्थानचे श्रीमंत छत्रपती बाबाजीराजे भोसले यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले.
राजेश भिसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शेतीतील अवलंबित्व कमी करुन समाजातील युवकांनी बौद्धिक संपदा वाढण्यिावर भर देण्याची गरज आहे. आजचे युग हे स्पर्धेचे आहे. युवकांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करीत गुणवत्तेच्या आधारे वेगळे अस्तित्व निर्माण करावे, असे मत तंजावर संस्थानचे श्रीमंत छत्रपती बाबाजीराजे भोसले यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले.
शहाजीराजे भोसले यांचे १३ वे वशंज बाबाजीराजे, हे जिजाऊ जयंतीच्या पूर्वसंध्येला जालन्यात आले होते. यावेळी त्यांनी ऐतिहासिक संदर्भ आणि सद्यस्थिती यावर आपले परखड मत व्यक्त केले. बाबाजीराजे हे आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची देशातील अग्रगण्य आयटी कंपनी आहे. जी-सॅप या परदेशी कंपनीशी स्पर्धा करते. शहाजीराजे भोसले यांनी ३५० वर्षांपूर्वी तंजावर प्रांत पादाक्रांत केला होता. अनेक वर्षे या प्रांतात भोसले घराण्याचे राज्य होते. तंजावर प्रांत आता तिरुवारु, नागपट्टम, तंजावर, अधरंगे आणि नाथटर या चार जिल्ह्यांत विभागला गेला आहे. या भागात छत्रम ट्रस्ट या नावाने विश्वस्त नेमून आजही तेथील गरजू आणि गरीब लोकांना आरोग्य, शिक्षण आदी सेवा दिली जात आहे.
बाबाजीराजे म्हणाले की, तंजावर प्रांतात ३५० वर्षांची परंपरा आजतागायत सुरू आहे. तिथल्या संस्कृतीत आम्ही मिसळलो. सर्व जाती धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन प्रगती साधत आहोत. महाराष्ट्रात तोच कित्ता गिरवला जावा. काळानुसार आता समाजाने बदलणे गरजेचे आहे. तरच समाजातील प्रत्येक घटक प्रगती करु शकेल. युवकांनी बौद्धिक संपदा विकसित आणि वाढविण्यावर भर देण्याच्या दृष्टिने सजग राहिले पाहिजे.
आज स्पर्धेचे जग असून, ज्यात गुणवत्ता असेल तोच यापुढे टिकू शकणार आहे. त्यामुळे शिक्षण आणि गुणवत्ता या दोन्ही बाबी आत्मसात करुन युवकांनी वाटचाल केली पाहिजे. नोकºयांवर अवलंबून न राहता युवक, मुलींनी कौशल्यावर आधारित शिक्षण घ्यावे. जेणेकरुन रोजगार निर्माण होऊन समाजातील अन्य बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करता येईल. तसेच उद्योग व्यवसायात उतरावे, असेही बाबाजीराजे म्हणाले.
३५० वर्षांची परंपरा...
भोसले घराण्याची ३२ गावांत १३ हजार एकर शेती आहे. ही बटई दिलेली असून, या शेतीतून मिळणारे उत्पन्न समाजाच्या कल्याणासाठी खर्च केले जाते. याला ३५० वर्षांची परंपरा असून, याकामी तेथील राज्य शासनाने दोन तहसीलदार व एक जिल्हाधिकारी स्तरावरील अधिकारी ट्रस्टला दिला आहे. यातून त्यांचे मानधनही दिले जात असल्याचे बाबाजीराजे भोसले यांनी सांगितले.
छत्रम ट्रस्टचे कार्य
तंजावर प्रांतात १३ हजार एकर शेती असून, यात विविध प्रकारचे उत्पादन घेतले जाते. त्यातून मिळणाºया उत्पन्नाद्वारे छत्रम ट्रस्ट कार्य करते. वसतिगृह, शाळा, महाविद्यालय चालविले जात आहेत. वसतिगृहात १२०० मुले राहतात. तसेच गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोफत आरोग्यसेवा दिली जाते.