जिल्हा परिषद प्रशासन, खासगी संस्था चालकांमध्ये जुंपली...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 01:03 AM2019-09-23T01:03:25+5:302019-09-23T01:03:44+5:30
जिल्हा परिषदेने नियम बाह्य सुरु केलेले पाचवी व आठवीचे वर्ग प्रशासनाने बंद करावे, अशी मागणी खासगी शिक्षकांनी केली आहे. परंतु, शासनाने सुरु केलेले वर्ग प्रशासनास बंद करता येत नसल्याने प्रशासन व खासगी संस्था चालकांमध्ये वाद सुरु आहे.
दीपक ढोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्हा परिषदेने नियम बाह्य सुरु केलेले पाचवी व आठवीचे वर्ग प्रशासनाने बंद करावे, अशी मागणी खासगी शिक्षकांनी केली आहे. परंतु, शासनाने सुरु केलेले वर्ग प्रशासनास बंद करता येत नसल्याने प्रशासन व खासगी संस्था चालकांमध्ये वाद सुरु आहे.
राज्यातील प्राथमिक शाळांना पाचवी व आठवीचा वर्ग शासनस्तरावरून मान्य करण्यात आला होता. त्यानुसार जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगरपालिका आदी शाळांमध्ये या वर्गांना जोडण्याची मान्यता देण्यात आली. मात्र खासगी संस्था व प्रशासन यांच्यामध्ये वर्ग उघडण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. बहुतांश विद्यार्थी ५ वी ते ८ वी पर्यंत जिल्हा परिषद शाळेतच शिक्षण घेत असल्याने संस्थेकडे प्रवेश घेण्याचा कल कमी झाला आहे. यामुळे संस्थेतील शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे हा वाद अधिकच वाढला आहे.
१ किलोमीटरच्या आत ५ वीचा वर्ग व ३ किलोमीटरच्या आत आठवीचा वर्ग नसावा, असा नियम आहे. असे असतानाही शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ५ वी व ८ वीचे वर्ग नियम बाह्य सुरु केले आहे. याचा परिणाम खाजगी संस्थांमधील विद्यार्थ्यांवर होत आहे. विद्यार्थी खाजगी संस्थांमधील प्रवेश काढुन जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घेत आहे.
याबाबत प्रशासनाला आतापर्यंत २३ तक्रारी प्राप्त झाल्या आहे. जिल्हा परिषद शाळेचे ५ वी व आठवीचे वर्ग बंद करण्याची मागणी खाजगी शाळेच्या शिक्षकांनी केली आहे.
यासाठी काही दिवसांपूर्वीच जि.प.समोर आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची प्रशासनाकडून अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासन व संस्था चालकांमध्ये चांगली जुपली आहे.
५ वी, ८ वीचे वर्ग सुरु करण्यावर निर्बंध
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ५ वी व आठवीचे वर्ग सुरु करण्यासाठी निर्बंध घातले आहे. जिल्हा परिषद अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत ५ वी व ८ वी वर्ग करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना राहणार आहे. पूर्वीप्रमाणे या वर्गांना सरसकट मान्यता देता येणार नाही. त्यासाठी विविध बाबींची पूर्तता करावी लागणार आहे.
जि.प. किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत ५ वी किंवा ८ वी वर्गासाठी पटसंख्येचे निर्बंध घालण्यात आले आहेत. ५ वी वर्गासाठी किमान ३० व ८ वीसाठी किमान ३५ पटसंख्या आवश्यक आहे. तरच ५ वी व ८ वीचे वर्ग सुरु करण्यास मंजुरी देण्यात येईल. तसेज वर्ग मान्यता देण्यासाठी वर्गखोली उपलब्ध असण्याची भौतिक अट, आठवीचा वर्ग सुरू करण्यासाठी विज्ञान प्रयोगशाळा असणे गरजेचे आहे, आदी अटी घालण्यात आल्या आहेत.
काय सांगतो नियम
१ किलोमीटरच्या आत ५ वीचा वर्ग व ३ किलोमीटरच्या आत आठवीचा वर्ग नसावा, असा नियम आहे. परंतु, तरीही शासनाने जिल्हा परिषद शाळांमध्ये ५ वी व ८ वीचे वर्ग दिले आहेत.