जि.प. ची विशेष सभा दीड तास तहकूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 01:05 AM2020-02-04T01:05:44+5:302020-02-04T01:06:14+5:30
विशेष सभेची नोटीस भाजपच्या अर्ध्या सदस्यांना मिळाली नाही. ज्या सदस्यांना अर्ज दाखल करायचे होते ते सदस्यच नोटीस न मिळाल्याने गैरहजर आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक कशी लढवणार, असा सवाल करत भाजपच्या सदस्यांनी सभेत गोंधळ केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : विशेष सभेची नोटीस भाजपच्या अर्ध्या सदस्यांना मिळाली नाही. ज्या सदस्यांना अर्ज दाखल करायचे होते ते सदस्यच नोटीस न मिळाल्याने गैरहजर आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक कशी लढवणार, असा सवाल करत भाजपच्या सदस्यांनी सभेत गोंधळ केला. त्यानंतर विषय समित्यांच्या सदस्य निवडीवरून दीड तास सभा तहकूब करण्यात आली. मार्ग न निघाल्याने पुढील सभेत विषय समित्यांच्या सदस्यांची निवड करण्यात येणार असल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले.
जालना जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सोमवारी विशेष सभा पार पडली. या सभेला जि. प. अध्यक्ष उत्तम वानखेडे, उपाध्यक्ष महेंद्र पवार, सभापती परसूवाले सईदाबी अब्दुल रऊफ, अयोध्या चव्हाण, प्रभा गायकवाड, पूजा सपाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, वित्त व लेखा अधिकारी उत्तम चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे यांची उपस्थिती होती.
सुभेची सुरूवात राष्ट्रगीताने झाली. सभेच्या सुरुवातीलाच भाजपचे सदस्य अवधूत खडके यांनी नोटीस न मिळाल्याचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, आजच्या सभेची नोटीस भाजपच्या अर्ध्या सदस्यांना मिळाली नाही. प्रत्येक सभेलाच भाजपच्या सदस्यांना नोटीस दिली जात नाही. आज विषय समित्यांच्या सदस्यांची निवड आहे. ज्या सदस्यांना अर्ज भरायचे होते. तेच सदस्य गैरहजर असल्याचे म्हणत निवडणूक प्रक्रिया पुढील बैठकीत घ्यावी, अशी मागणी करत भाजपच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत सभात्याग करण्याचा प्रयत्न केला. माजी अध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांनी मध्यस्थी करून भाजपच्या सदस्यांना रोखले. माजी अध्यक्ष खोतकर यांनी अध्यक्षांना चर्चा करण्यासाठी अर्ध्या तासाचा वेळ मागितला. त्यानंतर तब्बल दीड तासाने सभेला सुरूवात झाली. परंतु, भाजपची मागणी मान्य न केल्याने सभेत पुन्हा गोंधळ उडाला. सदस्य निवडीची प्रक्रिया पुढील सभेत घेण्याची मागणी करत भाजपचे सदस्य चंद्रकांत साबळे, अवधूत खडके, फुगे आदी सदस्यांनी सभेत गोंधळ घातला. यावेळी जि.प. सदस्य, अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
तुम्ही शब्द पाळला नाही
आम्ही अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीतून माघार यासाठी घेतली होती की, आम्हाला दोन सभापती पद द्यावे. याबाबत वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चेचा देखील झाली. परंतु, आता तुम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांचा शब्द पाळला नाही. तुम्ही आमच्या नेत्यांचा अपमान केला, असल्याचा आरोप भाजपचे सदस्य चंद्रकांत साबळे यांनी केला.
माजी अध्यक्ष विसरले
निवडणूक प्रक्रियेवरून भाजपचे सदस्य गोंधळ करत होते. यावेळी माजी अध्यक्ष अनिरुध्द खोतकर म्हणाले की, मी सगळ््यांना सूचना करतो की, चर्चेसाठी अर्ध्या तासासाठी सभा तहकूब करावी, असे ते म्हणाले. त्यांना लक्षात आल्यानंतर मी विनंती करतो, असे ते म्हणाले. त्यांना अध्यक्ष नसल्याचा विसर पडल्याचे दिसून आले.
वंदे मातरम् सुरू असताना गोंधळ
आम्हाला निवडणूक प्रक्रिया कशी होणार आहे. याबाबत सांगा. तोपर्यंत सभा संपू नका, अशी मागणी भाजपच्या सदस्यांनी केली. परंतु, अध्यक्षांनी सभा संपल्याचे जाहीर केले. यावरून सभेत गोंधळ उडाला. भाजपचे सर्व सदस्य अध्यक्षांजवळ गेले.
त्याचवेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी केंद्रे यांच्या जवळील माईक भाजपच्या सदस्यांनी हिसकावून घेतला. त्यानंतर महाविकासआघाडीच्या सदस्यांनी वंदे मातरम् सुरू केले. वंदे मातरम् सुरू असताना तब्बल तीन ते चार मिनिटे सदस्यांनी गोंधळ सुरूच ठेवला होता.
अध्यक्ष, उपाध्यक्षांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न
नवनिर्वाचित अध्यक्ष उत्तम वानखेडे व उपाध्यक्ष महेंद्र पवार यांची ही पहिलीच सभा होती. त्यामुळे भाजपच्या सदस्यांनी उलट- सुलट प्रश्न विचारून त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु, माजी अध्यक्ष व माजी उपाध्यक्षांनी भाजपच्या सदस्यांना सडेतोड उत्तरे दिली. दरम्यान, कृषी विभाग व पशुसंवर्धन विभाग प्रभा गायकवाड यांच्याकडे देण्यात आला तर आरोग्य व शिक्षण विभाग पूजा सपाटे यांच्याकडे देण्यात आला.
जलव्यवस्थापन समिती द्या - भाजपची मागणी
महाविकास आघाडीने भाजपला जलव्यवस्थापन समिती द्यावी, अशी मागणी भाजपच्या सदस्यांनी केली. परंतु, जलव्यवस्थापन समिती देण्यास नकार दिल्याने सभेत मोठा गोंधळ उडाला होता.
सर्वांना नोटीस दिल्या
सर्व जिल्हा परिषद सदस्यांना नोटीस देण्यात आल्या होत्या. काही सदस्यांना व्हॉट्सअॅपवर कळविण्यात आले होते, असे मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी सांगितले.