1 198 फुकटय़ा प्रवाशांकडून दंड वसूल
By admin | Published: January 20, 2017 12:31 AM2017-01-20T00:31:50+5:302017-01-20T00:31:50+5:30
रेल्वेची तिकीट तपासणी मोहीम : दीड लाख रुपये दंड वसूल, 12 प्रवाशांना अटक
भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे डीआरएम सुधीरकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आज अचानक राबविण्यात आलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत (बस रेड/अॅम्बुस चेक) 198 विनातिकीट प्रवाशांकडून 71 हजार 915 रुपये दंड वसूल करण्यात आला.
या अचानक व बसने जाऊन राबविण्यात आलेल्या तिकीट तपासणी माहिमेमुळे रेल्वेने तिकीट न काढता फुकट प्रवास करणा:या प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेर्पयत विभागातील शिरसोली रेल्वेस्थानकावर पॅसेंजर व एक्स्प्रेस गाडय़ा थांबवून पथकातील कर्मचारी, अधिकारी यांनी प्रवाशांकडील तिकिटांची तपासणी केली. ज्या प्रवाशांकडे प्रवासाचे तिकीट नव्हते त्यांच्याकडून दंडाची रक्कम वसूल करून त्यांना रीतसर पावती देण्यात आली.
या तिकीट तपासणी मोहिमेत 198 प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून 71 हजार 915 रुपये दंड वसूल करण्यात आला शिवाय अनियमित प्रवास करणारे 204 प्रवाशांकडून 76 हजार 610 रुपयांची वसुली करण्यात आली.
भुसावळ येथून सकाळी सहा वाजता पथकातील अधिकारी, कर्मचारी यांनी शिरसोली स्थानक गाठले व सरळ तिकीट तपासणी सुरू केली.
दरम्यान या तिकीट तपासणी माहिमेत एकूण 402 केसेस करण्यात आल्या. त्यातून एक लाख 48 हजार 525 रुपयांची वसुली करण्यात आली.
अनधिकृत व्हेंडर्सवर कारवाई
मोहिमेत अनधिकृत व्हेंडर्स व विनातिकीट प्रवास करणा:या व दंड न भरणा:या 12 प्रवाशांना शिरसोली येथून बसने भुसावळ येथे आणून रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आल्याचे रेल्वेने अधिकृतपणे कळविले आहे.
भुसावळ येथील रेल्वेचे अधिकारी, तिकीट तपासणी कर्मचारी आणि आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांचा ताफा भुसावळ येथून बसने थेट शिरसोली येथे धडकला आणि लागलीच सकाळी 7 वाजता मोहीम सुरू केली.
तपासणीतील सहभाग
2 सुधीरकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. यात विभागीय वाणिज्य व्यवस्थापक व्ही.पी. दहाट, सहायक वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट तपासणी), विभागीय तिकीट निरीक्षक बी. एस. तडवी, मुख्य निरीक्षक एच. एस. अहुवालिया यांच्या नेतृत्वाखाली 39 तिकीट तपासणी कर्मचारी यांच्यासह आरपीएफचे वीस कर्मचारी, लोहमार्ग पोलीसचे दहा कर्मचारी असा ताफा तैनात होता.
या गाडय़ांमध्ये झाली तपासणी
3 शिरसोली रेल्वेस्थानकावर गाडी क्रमांक 11039 महाराष्ट्र एक्स्प्रेस, 51181 देवळाली-भुसावळ शटल पॅसेंजर, 12165 वाराणसी एक्स्प्रेस, 12859 मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस, 15017 काशी एक्स्प्रेस या प्रवासी गाडय़ांमध्ये अतिशय कठोरपणे तिकीट तपासणी करण्यात आली. शिरसोली हे लहान रेल्वेस्थानक आहे. या ठिकाणी एक्स्प्रेस थांबवून तपासणी करण्यात आली.
प्रवासी संख्या वाढविण्यासाठी मोहीम..
4भुसावळ येथून तिकीट तपासणी पथक बसने जळगावमार्गे शिरसोली येथे दाखल झाले. बसमधून उतरताच वाणिज्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी प्रवासी गाडय़ांची तपासणी केली. भुसावळ विभागातर्फे प्रथमच अशा पद्धतीने बसने जाऊन तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे. यापुढेही अशाच पद्धतीने तिकीट तपासणी मोहीम राबविण्यावर भर राहील. प्रवासी संख्या वाढीसासाठी अशी मोहीम राबविली जाते, असे सांगण्यात आले आहे. यातून महसूलही वाढतो.
आजच्या सारखीच तिकिट तपासणी मोहीम यापुढेही विभागात ठिकठिकाणी राबविण्यात येईल.प्रवाशांना विनातिकिट प्रवास करणे टाळावे.अधिकृत तिकिट घेऊनच प्रवास करावा. विनातिकिट प्रवास करताना आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल.
- सुनील मिश्रा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, डीआरएम कार्यालय, भुसावळ.