निंभोरा औद्यगिक वसाहतीसाठी भूसंपादनापोटी दीड कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2023 02:54 PM2023-09-08T14:54:08+5:302023-09-08T14:55:47+5:30
भडगाव तालुक्यात ७७ हेक्टरवर होणार एमआयडीसी.
कुंदन पाटील, जळगाव : निंभोरा (भडगाव) येथील नियोजित औद्यगिक वसाहतीसाठी महाराष्ट्र औद्यगिक विकास महामंडळाने १ कोटी ६८ लाख१५ हजारांच्या रकमेला मंजुरी दिली आहे. ही रक्कम बुधवारी बॅंक खात्यात वर्गही करण्यात आली आहे.
निंभोरा येथे औद्यगिक वसाहत उभारण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेसाठी २२.३६ हेक्टर खासगी तर ५५.३० हेक्टर सरकारी क्षेत्रावर भूसंपादनाची प्रक्रिया राबविली जाणार आहे. संपादनापोटी २२.२६ हेक्टर खासगी कृषी क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया तातडीने राबविण्यासाठी कृषी मुल्यांकनानुसार महाराष्ट्र औद्यगिक विकास महामंडळाने १ कोटी ६८ लाख १५ हजारांच्या रक्कम बॅंक खात्यात वर्ग केली आहे.निंभोऱ्यातील गट क्रमांक १७३/२, १७७ व २३७ या क्षेत्रावर औद्यगिक वसाहत उभारली जाणार आहे. मुल्यांकनानुसार रक्कम अदा केल्याने संबंधित शेतकऱ्यांना लवकरच लाभ मिळणार आहे. त्यानुसार औद्यगिक विकास महामंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना ही प्रक्रिया राबविण्यासाठी एक पत्र दिले आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी महसुल शाखा व भडगाव तहसीलदारांना यासंदर्भात प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले आहेत.
भूसंपादनाची प्रक्रिया राबविल्यानंतर संबंधित क्षेत्र औद्यगिक विकास महामंडळाकडे सपूर्द करण्यात येणार आहे. त्यामुळे निंभोरा परिसरात उद्योगांना चालना मिळणार असून रोजगारही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहे. -आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी.