काटेरी झुडपांमध्ये साठवून ठेवलेली २०० ब्रास वाळू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 11:57 AM2019-11-15T11:57:27+5:302019-11-15T11:58:17+5:30
लिलाव करणार
जळगाव : काटेरी झुडपे टाकून निमखेडी शिवारात लपवून ठेवलेली तब्बल २०० ब्रास वाळू गुरुवारी महसूलच्या पथकाने जप्त केली. सकाळी तपासणीदरम्यान ही वाळू आढळून आली. वाळूचा मालक पुढे आलेला नसून या वाळूचा लिलाव करण्यात येईल अथवा शासकीय कामांसाठी ती देण्यात येईल, असे सांगण्यात आले.
जिल्ह्यात अवैध वाळू उपशावर नियंत्रण मिळविण्यासाठी महसूल पथकाच्यावतीने तपासणी सुरू असून गुरुवारी सकाळी मोहाडी, दापोरा, शिरसोली तसेच निमखेडी या भागात तपासणी करीत असताना निमखेडी गावापासून काही अंतरावर एका ठिकाणी काटेरी झुडपे टाकून वाळू लपवून ठेवली असल्याचे आढळून आले. त्या ठिकाणी प्रांताधिकारी दीपमाला चौरे, जिल्हा खनीकर्म अधिकारी दीपक चव्हाण, तहसीलदार वैशाली हिंगे यांनी पाहणी केली असता २५ ते ३० साठे आढळून आले.
पंचनामा व इतर प्रक्रियेदरम्यान साठा गायब होऊ शकतो, त्यामुळे दक्षता म्हणून पथकाने तत्काळ हा साठा उचलून जिल्हाधिकारी परिसरात आणून ठेवला.
जवळपास २०० ब्रास हा साठा असून प्रांताधिकाऱ्यांकडून सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येऊन या वाळू साठ्याचा एकतर लिलाव करण्यात येईल अथवा शासकीय कामांसाठी ती देण्यात येईल, असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
दरम्यान, महसूल पथकाकडून कारवाई सुरू असली तरी अवैध गौण खनिज वाहतूक सुरूच असल्याचे आढळून येत आहे. गुरुवारी हा साठा जप्त करण्यापूर्वी मुरुमाची अवैध वाहतूक करणारे दोन डंपर पकडण्यात येऊन त्यांना एक कोटी तीन लाख चार हजारांचा दंड करण्यात आला होता.