ठेकेदारास एक कोटी ४० लाखांची दंडाची नोटीस
By Admin | Published: March 23, 2017 12:19 AM2017-03-23T00:19:15+5:302017-03-23T00:19:15+5:30
अवैद्य वाळू वाहतूक : रॉयल्टी नाही
अमळनेर : शासकीय कामासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता आणि रॉयल्टी न भरता ५०० ब्रास वाळू वाहतूक करणाºया सुनील भास्कर पाटील (जळगाव) या ठेकेदारास १ कोटी ३९ लाख ७० हजार रुपये दंडाची नोटीस तहसीलदार प्रदीप पाटील यांनी बजावली आहे.
तासखेडे येथील अभिमन नागो पाटील हे विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टरवर अवैध वाळू वाहतूक सुनील पाटील यांनी घेतलेल्या शासकीय कामासाठी करत असल्याचे आढळून आले.
वाळू या गौण खनिजाचा लिलाव झाल्याशिवाय कोणत्याही नदीपात्रातील वाळू वाहतूक करता येत नाही. शासकीय ठेकेदारांनाही वाळू लिलाव मंजूर झालेल्या लिलावधारकाकडूनच वाळू विकत घ्यावी लागते. मात्र पाटील यांनी कोणत्याही प्रकारची रॉयल्टी न भरता वाळू उत्खनन केल्याचे नोटिसीत म्हटले आहे.
प्रती ब्रास २५ हजार रुपये दंडाप्रमाणे सव्वा कोटी रुपये आणि रॉयल्टीची रक्कम २ लाख रुपये तसेच खनिज विकास १० टक्के निधी १२ लाख ७० हजार रुपये अशी एकूण १ कोटी ३९ लाख ७० हजार रुपये दंडाची कार्यवाही का करण्यात येऊ नये, अशा आशयाची नोटीस त्यांना बजावण्यात आली आहे.
याचा खुलासा तीन दिवसात मागविण्यात आलेला आहे. महसूल प्रशासनाने दिलेल्या या दंडात्मक कारवाईच्या नोटिसीमुळे अवैध वाळू उत्खनन करणाºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.