दीड कोटींची अवैध दारु जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 11:10 AM2019-02-07T11:10:12+5:302019-02-07T11:11:00+5:30
पाच जणांना अटक
जळगाव / चाळीसगाव : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मंगळवारी रात्री धुळे-औरंगाबाद रस्त्यावरील मेहुणबारे शिवारात १ कोटी ४२ लाख २ हजार ९१२ रुपये किमतीची अवैध दारु पकडली. २१ लाख रुपये किमतीच्या दोन वाहनांसह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्वांविरुध्द दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक कंटेनर व कार या वाहनासह एकूण मालाची किंमत १ कोटी ६३ लाख २७ हजार ९१२ रुपये आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.
असलम अली खान (रा.मजालगड, ता.पुन्हाना, जि.मेवत, हरियाणा), मोहम्मद समीम अब्दुल गफुर (रा.जमालगड, ता.पुन्हाना, जि.मेवत,हरियाणा), रवींद्र हिंमतसिंग पावरा (रा.माळ, ता.धडगाव, जि.नंदूरबार), खुशीरद सरीफ खान (रा. जलालपुर,ता.हथील, जि.पलवल, हरियाणा) व एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
त्यातील अल्पवयीन मुलगा वगळता चौघांना बुधवारी न्यायालयाने ८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
परराज्यातील दारू चाळीसगावी
कोट्यवधी रुपये किमतीची परराज्यातील अवैध दारु चाळीसगाव तालुक्यात येत असल्याची गुप्त माहिती विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांना मिळाली होती.
त्यानुसार विभागाच्या आयुक्त अश्विनी जोशी, संचालक सुनील चव्हाण व प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगावचे अधीक्षक सुधीर आढाव, धुळ्याचे अधीक्षक मनोहर अंचुळे, निरीक्षक एम.बी.चव्हाण, संजय कोल्हे, महाडिक, दुय्यम निरीक्षक देवदत्त पोटे, सी.एच.पाटील, वसंत माळी, आनंद पाटील, किशोर गायकवाड, सहायक दुय्यम निरीक्षक ब्राह्मणे, कॉन्स्टेबल कैलास कसबे, अमित गांगुर्डे, दीपक आव्हाड, विठ्ठल हाके, गोरक्षनाथ अहिरे, संतोष निकम, मुकेश पाटील, प्रवीण वाघ, भाऊसाहेब पाटील, सागर देशमुख व प्रकाश तायडे आदींच्या पथकाने मंगळवारी रात्री मेहुणबारे शिवारात सापळा लावून कारवाई यशस्वी केली.
पंजाब ट्रान्सपोर्टचे बनावट बील
पथकाने कंटनेरसह पाच जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर कागदपत्रांची तपासणी केली असता त्यात धीरज ट्रान्सपोर्ट कंपनी संगरुर, पंजाब नावाचा वाहतूक परवाना व इतर कागदपत्रे सादर केली. कंटेनरमधील दारुच्या बाटल्यांवरील बॅच व बीलावरील बॅच याच्यात तफावत होती. त्यामुळे ही दारु नेमकी पंजाब मधून आली की हरियाणातून हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एका कंपनीच्या ७५० मिलीच्या १८ हजार बाटल्या तर दुसऱ्या कंपनीच्या २४ बाटल्या दीड हजार खोक्यांमध्ये आढळून आल्या. कार क्र.एच.आर.९३-२२१३ व कंटेनर क्र.एच.आर.७४-७३४६ हे दोन वाहने जप्त करण्यात आले आहेत. दारूचे नमुने घेण्यात आल्याची माहिती अधीक्षक सुधीर आढाव यांनी दिली.