कजगाव परिसरात बादलीभर पाण्यासाठी १ कि.मी. पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:55 AM2019-03-11T00:55:43+5:302019-03-11T00:55:55+5:30
वाढत्या उन्हासोबत टंचाईच्या झळा तीव्र
कजगाव, ता. भडगाव : ऊन्हाची तीव्रता जसजशी वाढत आहे तसतसे तितूर नदी काठावरील गावात पाणी टंचाईचेही चटके तीव्र होऊ लागले आहेत. मळगाव, तांदुळवाडी, पासर्डी या गावामध्ये शोधून देखील पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. बादलीभर पाण्यासाठी एक कि.मी. पायपीट करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. त्यामुळे या गावांमध्ये तत्काळ टँकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पावसाळ््यापासून नदी पात्र कोरडेठाक
गेल्या वर्षी कमी पावसामुळे तितूर नदी जेमतेम वाहिली. त्यात चाळीसगाव तालुक्याच्या सीमेपर्यंत तितूर नदीवर सिमेंटचे पक्के बंधारे (विना दरवाजाचे) बांधण्यात आले आहे. त्या मुळे या बंधाऱ्यातून पाणी पुढे आलेच नाही व या नदीची पाण्याची बारीक धारदेखील भडगाव तालुक्यातील सहा गावात व पाचोरा तालुक्यातील दोन गावात पोहचलीच नाही.
त्यामुळे या आठ गावातील तितूर नदीचे पात्र चक्क पावसाळ्यातदेखील कोरडेच होते. या मुळे या भागात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
पासर्डी येथे २० दिवसाआड पाणीपुरवठा
कजगावपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पासर्डी, ता भडगाव येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. येथे वीस दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. १९९८ मध्ये लोकवर्गणीतून खोदलेल्या विहिरीवरून गावास पाणी पुरवठा केला जातो. मात्र याच विहिरीने तळ गाठल्याने पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. गावकऱ्यांना सकाळी लवकर उठून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
एक किलोमीटर अंतरावरील सार्वजनिक विहिरीवरून बादली-बादली पाणी तोलून काढायचे, नंतर ते एक किलोमीटर डोक्यावर घेत घर गाठावे लागत आहे. यात घरातील सर्वच सदस्यांचा आता दिनक्रम झाला आहे. यात लहान मुली, मुलं हे सारेच पाण्यासाठी एक किलोमीटरची पायपीट करीत आहे. यावर तोडगा म्हणून पासर्डी ग्रामपंचायतकडून विहीर अधिग्रहित करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र अद्याप विहीर अधिग्रहित न झाल्याने पाणी समस्या कठीण झाली आहे.
जमिनीत पाणीच नसल्याने विहिरी कोरड्या
तितूर नदीच पूर्ण पावसाळ्यात कोरडी ठाक होती. या मुळे जमिनीतील जलपातळी खोल गेल्यामुळे बहुतांष विहिरी कोरड्या पडल्या आहेत तर काही प्रमाणात बागायती शेतीतील विहिरींना गुरांचा पाणी प्रश्न सुटेल एवढे पाणी आहे.
दिवसभर शोध घेतल्यानंतर मिळते गुरांना पाणी
माणसांनाच पिण्यासाठी पाणी नाही तर पशुधनास पाणी आणाव कोठून या विवंचनेत पशूपालक असल्याचे चित्र आहे. दिवसभर शोध मोहीम राबवत पाण्याचा शोध घेतल्यानंतर त्या शेत मालकाच्या विनवण्या करत गुरांना पाणी मिळत आहे. मात्र या साठी गावकऱ्यांना दिवसभर पाणी शोध मोहीम राबवावी लागत आहे.
कजगाव, पासर्डी, तांदुळवाडी, मळगाव, उमरखेड, भोरटेक या भडगाव तालुक्यातील सहा गाव व पिंप्री, घुसर्डी या पाचोरा तालुक्यातील दोन गावांत केवळ तितूर नदी हीच अमृतधारा आहे. मात्र तिच्या अमृत धारेचेच हरण झाल्याने तूर्त तरी तांदुळवाडी, पासर्डी व मळगाव या तीन गावात गिरणा नदी वरून टँकरने पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे, अशी मागणी होऊ लागली आहे. परिसरातील बºयाच विहिरी कोरड्या पडल्या आहेत तर अनेक विहिरींनी तळ गाठला आहे त्यामुळे कितीही विहिरी अधिग्रहित केल्या तरी त्याचा काही उपयोग होणार नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे गिरणेवरून टँकरने पाणी पुरवठा करणे हेच सोयीचे होईल व पाणी प्रश्न काही प्रमाणात मिटेल, एवढी आशा आता केली जात आहे.