महिनाभरात १ लाख ४५ हजारांवर लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:14 AM2021-05-01T04:14:57+5:302021-05-01T04:14:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाशी लढा देण्यासाठी सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला गेल्या चार महिन्यांच्या तुलनेत एप्रिलमध्ये ...

1 lakh 45 thousand vaccinations in a month | महिनाभरात १ लाख ४५ हजारांवर लसीकरण

महिनाभरात १ लाख ४५ हजारांवर लसीकरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाशी लढा देण्यासाठी सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला गेल्या चार महिन्यांच्या तुलनेत एप्रिलमध्ये सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. या मोहिमेने गती पकडली असताना वरिष्ठ पातळीवरून लसीकरणासाठी डोस समप्रमाणात उपलब्ध होत नसल्याने या लढ्यात खंड पडत आहे. गेल्या महिनाभरात १ लाख १० हजार ११९ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.

जिल्हाभरात १३३ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. यात शहरात सहा केंद्र आहेत. यासह खासगी ३४ रुग्णालयांमध्येही ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. सद्यस्थितीत ४५ वर्षांवरील सर्वांना लसीकरण सुरू आहे. यात पहिला व दुसरा डोस असे एकत्रित लसीकरण एका केंद्रावर सुरू असते. त्या प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध होणे अपेक्षित असते. अद्यापही ४५ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण पूर्ण व्हायला मोठा कालावधी लागणार आहे. ही संख्या जिल्ह्यात १४ लाखांवर आहे.

एप्रिलमध्ये उपलब्ध झालेले डोस : १७१६०१

२९ एप्रिलपर्यंत झालेले लसीकरण : १४५८८५

आजपर्यंतचे एकूण लसीकरण : २८९६३४

सरासरी रोजचे लसीकरण : ५०३०

लस मिळणार नाही म्हणून गर्दी

गेल्या दीड महिन्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढला. यात मृत्युदरही वाढला, शिवाय रुग्ण अधिक प्रमाणात गंभीर होत असल्याने कोरोनावर सद्यस्थिती प्रभावी उपाय म्हणून लसीकरणाकडे बघितले जात असून तज्ज्ञांकडून होणारे आवाहन तसेच स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी आता लसीकरणाकडे बघितले जात आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात सर्वच केंद्रावर गर्दी वाढली आहे. त्यातही उशीर झाल्यास लस मिळणार नाही, असे म्हणत सकाळपासून केंद्रावर नागरिकांची गर्दी होत आहे.

दुसऱ्या डोसचा संभ्रम

पहिला डोस कोव्हॅक्सिनचा घेतलेल्यांसाठी दुसऱ्या डोसचा संभ्रम निर्माण झाला आहे. कोविशिल्ड लसीचे डोस वेळवर उपलब्ध होत असताना कोव्हॅक्सिनचे डोस त्या प्रमाणात येत नाहीत, अशा स्थितीत दुसऱ्या डोसला उशीर तर होणार नाही, अशी संभ्रमावस्था अनेक नागरिकांमध्ये आहे. मात्र, पहिल्या व दुसऱ्या डोसमध्ये किमान ४५ दिवसांचे अंतर असल्यास अधिक चांगले, यात थोडा वेळ झाला तरी काही हरकत नाही, तोपर्यंत लस उपलब्ध होऊन जाते, असे डॉ. राम रावलानी यांनी सांगितले.

लसीकरण केंद्रावरची स्थिती

- रेडक्रॉस रक्तपेढीतील लसीकरण केंद्रावर सकाळी कूपन दिले जातात. या ठिकाणी कूपनसाठी गर्दी होत असते. त्यानंतर कूपननुसार बोलावून लस दिली जाते. दिवसातून साधारण २५० लसीकरण या केंद्रावर होत असते. सकाळपासून नागरिकांची गर्दी असते.

- शाहू महाराज रुग्णालयात गेल्या आठवड्यात मोठी गर्दी उसळली होती. तीन तीन दिवस येऊनही लसीकरणाला नंबर लागत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. लस उपलब्ध नसल्याने हे केंद्र कधी बंद, तर कधी सुरू असे चित्र गेल्या आठवड्यात होते.

- रोटरी हाॅल येथे सकाळी ७ वाजेपासून लसीकरणासाठी कूपनचे वाटप केले जाते. या ठिकाणी पहाटे ४ वाजेपासून लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांची गर्दी होत आहे. नुकताच रोटरीने या केंद्रावर दहा हजारांचा लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे.

- डी. बी. जैन रुग्णालयात नागरिकांची प्रचंड गर्दी होत असताना त्यामानाने लसीचा साठा या ठिकाणी उपलब्ध नसतो. त्यामुळे या केंद्रावरही गोंधळाचे वातावरण असते.

- चेतनदास मेहता आणि नानीबाई रुग्णालयात दिवसाला सरासरी २०० ते २५० लसीकरण होत असते.

- जिल्ह्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण सुरू असून, या ठिकाणीच आजपर्यंत सर्वाधिक लसीकरण झाले आहे.

एप्रिल महिन्यात असे प्राप्त झाले डोस

१ एप्रिल : कोविशिल्ड : २७,०००

६ एप्रिल : काेविशिल्ड : २,०२१, कोव्हॅक्सिन : ३६,४८०

१२ एप्रिल : कोविशिल्ड ४०,२००

१९ एपिल : कोविशिल्ड ५,०००, कोव्हॅक्सिन ८,८६०

२१ एप्रिल : कोविशिल्ड ९,६४०

२४ एप्रिल : कोविशिल्ड २५,०००

२६ एप्रिल : कोव्हॅक्सिन २,४००

२९ एप्रिल : काेविशिल्ड १५,०००

कुठे सर्वाधिक लसीकरण

प्राथमिक आरोग्य केंद्र ७६,८०९

खासगी रुग्णालये ३९,७४४

जीएमसी आताचे रेडक्रॉस रक्तपेढी केंद्र ११,१८३

शाहू नगर ७,००९

चेतनदास मेहता रुग्णालय : २,८४७

नानीबाई रुग्णालय : २,४४४

डी. बी. जैन रुग्णालय : २,४४४

मार्च महिन्यात

पहिला डोस १,०३,९१७

दुसरा डोस ११,९१६

एप्रिल महिन्यात

पहिला डोस १,१०,११९

दुसरा डोस ३५,७६६

कोट

शहरात महापालिकेच्या तीन केंद्रावर लसीकरण सुरू असून, नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून जेवढ्या प्रमाणात लस उपलब्ध होत आहे. तेवढ्या प्रमाणात सरासरी रोज ९०० ते १ हजार लसीकरण केंद्रावर होते.

- डॉ. राम रावलानी, प्रमुख वैद्यकीय अधिकारी, मनपा

Web Title: 1 lakh 45 thousand vaccinations in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.