मजुरीसाठी गेलेले ११ कुटुंबातील ६१ सदस्य सुरतमध्ये अडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 12:40 PM2020-03-28T12:40:03+5:302020-03-28T12:40:36+5:30
मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे राकेश जाधव यांची तक्रार
चाळीसगाव : सुरत येथील होजीवाला एमआयडीसी येथे मजुरीसाठी गेलेली चाळीसगाव तालुक्यातील विविध तांड्यातील ११ कुटुंबातील ६१ सदस्य सुरत येथेच अडकली आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस त्यांना सुरत सोडून जाऊ देण्यास मज्जाव करीत असल्याची तक्रार असून या सर्व कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असल्याचे तक्रारीत नमुद आहे. या कुटुंबियांचा सहानुभूतीने विचार करून त्यांची उपासमार टाळावी व त्यांना मदत करण्याची मागणी बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांचेकडे केली आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देशात सुरू असलेल्या मोहिमेत सहभागी असलेल्या कारखाना मालकांनी कारखाने बंद केल्याने त्यांची मजुरी गेली आहे. कारखाने मालकांनी त्यांना गावी जाण्याचे सांगितले आहे. मात्र त्यांना पैसा व साधनांच्या अभावापायी आपल्या गावी जाणे शक्य होत नाही. सर्वत्र संचारबंदी आहे. शिवाय त्यांच्याजवळ पैसा ही नाही. अशा परिस्थितीत या कुटुंबाची मोठी कोंडी झाली आहे.
हे लोक सध्या सूरतमध्येच आहेत. संचारबंदी असल्याने त्यांचे हाल होत आहेत. त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
या मजुरांना गावी येण्यासाठी सुविधा व रेशनची व्यवस्था त्वरित करून द्यावी व त्यांची होणारी उपासमार टाळावी. त्यासाठी संबंधितांना योग्य सूचना कराव्यात अशी मागणी राकेश जाधव प्रशासनाकडे केली आहे.