आरटीई प्रवेश प्रक्रियेकडे ३१ शाळांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 12:14 PM2020-02-10T12:14:35+5:302020-02-10T12:14:43+5:30
जळगाव : शिक्षणहक्क (आरटीई) प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीसाठीची मुदत ६ फेब्रुवारी रोजी संपली तरी जिल्ह्यातील ३१ शाळांनी या नोंदणीकडे पाठ ...
जळगाव : शिक्षणहक्क (आरटीई) प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीसाठीची मुदत ६ फेब्रुवारी रोजी संपली तरी जिल्ह्यातील ३१ शाळांनी या नोंदणीकडे पाठ फिरविली आहे. प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या नोंदणी प्रक्रियेत २९० पैकी २५९ शाळांनीच मुदतीत नोंदणी केली आहे.
शिक्षण विभागाच्यावतीने आर्थिक व दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के जागांवर प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या प्रक्रियेंतर्गत यंदा एकच सोडत काढण्यात येणार आहे. गेल्या वर्षाप्रमाणे यावर्षीही शिक्षण हक्क प्रवेशप्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. जळगाव शहर व जिल्ह्यातील २९० शाळांमध्ये ३ हजारांहून अधिक प्रवेशाच्या जागा यासाठी उपलब्ध होणार आहे.
स्वयंअर्थसहाय्यित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित (अल्पसंख्याक शाळा वगळून) पात्र शाळांची यादी लवकरच जाहीर केली जाणार असून त्यानुसार पूर्व प्राथमिक (नर्सरी) व प्राथमिक (पहिली) इयत्तेसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. यासाठी संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.
या प्रवेश प्रक्रियेसाठी २१ जानेवारीपासून शाळांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली व ६ फेब्रुवारीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार होती. मात्र वेळेत ती पूर्ण न झाल्याने त्यास एक दिवसाची मुदतवाढही देण्यात आली होती. आरटीई प्रवेशांतर्गत या पूर्वी २०१८ मध्ये चार तर २०१९ मध्ये तीन सोडती काढण्यात आल्या होत्या.