१२५ वृक्ष तोडले; कृऊबाला १२ लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:46 PM2019-08-29T12:46:34+5:302019-08-29T12:47:12+5:30
मनपा वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय : डीपी रोड तयार करण्यासाठी तोडले गेले होते वृक्ष
जळगाव : व्यापारी संकूल तयार करण्यासाठी संरक्षण भिंत तोडून त्याठिकाणी डीपी रोड तयार करण्यासाठी १२५ वृक्षांची कत्तल केल्याप्रकणी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाला १२ लाख ५० हजार रुपयांचा दंड मनपाने ठोठावला आहे. बुधवारी मनपाच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी उपायुक्त उत्कर्ष गुट्टे, वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य व नगरसेवक नितिन बरडे, प्रशांत नाईक, डॉ.चंद्र्रशेखर पाटील, प्रविण कोल्हे, किशोर बाविस्कर, रंजना सोनार यांच्यासह अधिकारी सुनील भोळे, सुशील साळुंखे, एस.एस.पाटील, प्रभाग अधिकारी, उदय पाटील व विलास सोनवणे उपस्थित होते. सभेच्या विषय पत्रिकेवर फांद्या व वृक्ष तोडीचे १९ प्रस्ताव होते. तर आयत्यावेळीचे ४ प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आले.
मालपुरे यांनी केली होती तक्रार
बाजार समिती परिसरात नवीन संकुल तयार करण्यासाठी संबधित मक्तेदाराकडून बाजार समितीची संरक्षण भिंत तोडण्यात आली होती. यावेळी ठिकाणी लावण्यात आलेले १२५ वृक्ष मनपाची कुठलीही परवानगी न घेता तोडण्यात आली होती. याबाबत शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांनी मनपा आयुक्तांकडे तक्रार केली होती. तसेच वृक्षांची विनापरवानगी कत्तल केल्याप्रकरणी कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर मनपा अधिकारी व अभियंत्यांनी बाजार समिती परिसराची पाहणी केली असता, वृक्ष तोडल्याबाबतचे कुठलेही पुरावे आढळून आले नव्हते. त्यानंतर गुगल अर्थ च्या सहाय्याने तपासणी केली असता, बाजार समिती परिसरात वृक्षांची लागवड झाल्याचे आढळून आले होते.
चौपदरीकरणात अनेक वृक्षांची होणार कत्तल
शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी कालींका माता चौक ते खोटेनगर स्टॉपपर्यंतच्या कामादरम्यान अनेक वृक्षांची कत्तल होणार आहे. ही सर्व वृक्ष तोडण्याबाबत ‘नही’ (राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाकडून मनपाला परवानगीबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे. या प्रस्तावावर देखील बैठकीत चर्चा करण्यात आली.
प्रती झाड १० हजार रुपयांचा दंड
परवानगी न घेता वृक्ष तोडल्याप्रकरणी कृषी उत्पन्न समितीला प्रती झाड १० हजार रुपये प्रमाणे एकूण १२ लाख ५० हजार रुपये दंड करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. दरम्यान, बाजार समितीने अजून परिसरातील ३७ वृक्ष तोडण्याची परवानगी मागीतली असून, त्यावर देखील या बैठकीत चर्चा करण्यात आली. संकूलाच्या कामासाठी जे वृक्ष अडथळा ठरत असतील तेच वृक्ष तोडण्याची परवानगी मनपाने देण्याचा निर्णयही या बैठकीत झाला. तसेच प्रत्येक वृक्षाला पाच वृक्षांप्रमाणे वृक्षरोपण करण्याचा ठराव करुन हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.