अस्तित्वात नसलेल्या रस्त्यासाठी १० कोटी, मनपाच्या महासभेत नितीन लढ्ढांनी ठेवले प्रशासनाच्या चुकीवर बोट
By सुनील पाटील | Published: April 21, 2023 07:53 PM2023-04-21T19:53:42+5:302023-04-21T19:53:48+5:30
शासकीय पैशाचा अपव्यय
जळगाव : पाचोरा रोड ते छत्रपती संभाजी नगर रस्ता अस्तित्वात नाही. मात्र, त्यासाठी ८५ कोटींतून १० कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. शिरसोली रस्त्यावरील जुना जकात नाका, गितांजली केमिकल्स ते सुप्रीम कॉलनी अशा तीन किलोमीटर अंतरासाठी हा निधी मंजूर झाला आहे. मुळात हा भाग ग्रीन झोन आहे.
त्याला शासनाने अजून मान्यताच दिलेली नाही. त्याशिवाय कार्यादेश व डांबरीकरण झालेल्या रस्त्यांवर पुन्हा कॉक्रीटीकरण करुन त्यावर पैसा खर्च केला जात आहे. नगरसेवक व जळगावकरांच्या भावनांशी कागदोपत्री खेळ सुरू असल्याची टीका ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी शुक्रवारी झालेल्या महासभेत केली.
महापालिकेची महासभा शुक्रवार, दि. २१ एप्रिल रोजी महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शहरातील रस्त्यांसाठी मंजूर झालेला निधी, प्रत्यक्षात मिळालेला निधी व त्यातून झालेली कामे याचा प्रवास मांडत असताना चुकीच्या पद्धतीने नियोजन झाल्याने पैसा कसा वाया जात आहे, याचे पुरावे नितीन लढ्ढा यांनी लक्ष्यवेधीच्या माध्यमातून सभेत दिले.
कसा होतोय पैशाचा अपव्यय...
नितीन लढ्ढा यांनी काही महत्त्वाच्या रस्त्यांचे पुरावे दिले. त्यात शासनाने आता पुन्हा रस्त्यांसाठी ८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यात नेरी नाका ते अजिंठा चौक या एक किलीमोटर रस्त्यासाठी ३.५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. याच कामासाठी ३८ कोटींच्या निधीतूनही टॉवर चौक ते अजिंठा चौक डांबरीकरणाचा कार्यादेश झालेला आहे. निमखेडी ते सुरत रेल्वे गेट, सुरत रेल्वे गेट ते शिवाजी नगर-टॉवर चौक, आसोदा रोड काँक्रीटीकरणासाठी २१ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
आधी ३८ कोटींच्या निधीतून या रस्त्याचे डांबरीकरणाचे निम्मे काम झाले आहे. काम अंतिम टप्प्यात असताना मक्तेदाराला काम थांबविण्याचे तोंडी आदेश देण्यात आले. टॉवर चौक ते बालाजी मंदिर या रस्त्याचे तीन महिन्यांपूर्वीच डांबरीकरण झाले. आता त्यावर पुन्हा काँक्रीटीकरण केले जाणार आहे. नुक्कड चौक ते लांडोरखोरी या पाच कोटी रुपयांच्या रस्त्याचे कार्यादेश झालेले आहेत. यातील काही रस्ता डांबरीकरण झालेला आहे.आता या रस्त्याचेही काम थांबविण्याचे आदेश झाले.