अट्रावल येथे दोन गटात दंगल महिला फौजदारासह दहा जण जखमी, १२ जण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 06:31 PM2023-04-01T18:31:28+5:302023-04-01T18:31:39+5:30
यात महिला फौजदारासह दहा जण जखमी झाले. १२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
डी.बी. पाटील
यावल जि. जळगाव : अट्रावल ता. यावल येथे बारागाड्यांवरून शुक्रवारी सायंकाळी झालेला वाद शनिवारी सकाळी ११ वाजता उफाळून आला. यात थोर पुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने दोन गटात हाणामारी व नंतर दगडफेक झाली. यात महिला फौजदारासह दहा जण जखमी झाले. १२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
घटनेचे वृत्त कळतात येथील पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, प्रशासनाच्या वतीने थोर पुरुषांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना करण्यात आली आहे.
अट्रावल येथे शुक्रवारी सायंकाळी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम होता. त्यावर बसण्यावरून एका तरुणाशी वाद झाला होता. हा वाद शनिवारी सकाळी पुन्हा उफाळून आला. काही समाजकंटकांनी पुतळ्याची विटंबना केली. दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आली. यात आठ ते दहा जण जखमी झाले. त्यांच्यावर यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच येथील पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. यात एका पोलिसासह फौजदार सुनीता कोळपकर ह्या जखमी झाल्या आहेत.
गावात पोलिस छावणीचे स्वरूपयावल पोलिसांसह फैजपूर, भुसावळ, जळगाव, सावदा, पोलिसांसह दंगा नियंत्रण पथक घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे.
१० ते १२ जण ताब्यात
दोन गटात वाद होऊन हाणामारी झाली. दहा ते बारा जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच प्रशासनाच्या वतीने थोर पुरुषांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना करण्यात आली आहे. युवक व नागरिकांनी अफवांना बळी पडू नये.
- एम. राजकुमार, जिल्हा पोलिस अधीक्षक, जळगाव.