दोन अधिकाऱ्यांसह १० शिक्षकांचा राष्ट्रीय शैक्षणिक आगाजतर्फे गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 04:36 PM2020-10-07T16:36:21+5:302020-10-07T16:36:40+5:30
जागतिक शिक्षकदिनाचे औचित्य साधून शैक्षणिक आगाज या संस्थेतर्फे १० शिक्षकांना स्मार्ट टीचर म्हणून गौरवण्यात आले.
भुसावळ : जागतिक शिक्षकदिनाचे औचित्य साधून शैक्षणिक आगाज या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेतर्फे गुणो से गुणवत्ता तक या उपक्रमांतर्गत डायटच्या दोन अधिकाऱ्यांना स्मार्ट एज्युकेशन आॅफिसर तर १० शिक्षकांना स्मार्ट टीचर म्हणून गौरवण्यात आले.
संपूर्ण देशभरातून विविध राज्यातील शिक्षकांना शिक्षण, योग, आरोग्य व निसर्ग यासंदर्भात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल शैक्षणिक आगाजच्या संस्थापक स्मृती चौधरी, सुभाष राबरा, डॉ.अजय बलहरा, सोनू कुमार यांच्या स्वाक्षरीनिशी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले आहे.
कोरोनामुळे हा कार्यक्रम जाहीररीत्या होऊ शकला नाही. त्यामुळे पुरस्कार्थींपर्यंत प्रमाणपत्र पोहोचविण्यात आले आहे. यात नाशिक डायटचे प्राचार्य डॉ.डी.डी.सूर्यवंशी व जळगाव डायटचे अधिव्याख्याता प्रा. शैलेश पाटील यांना स्मार्ट एज्युकेशन आॅफिसर, तर नाना पाटील (भुसावळ), अजय काळे (सांगली), डॉ.जगदीश पाटील (जळगाव), वैशाली पाटील (भडगाव), गिरीश भंगाळे (खानापूर), अविनाश कुमावत (चोपडा), सुरेश अहिरे (भुसावळ), शेख सगीर हुसेन जहिरूद्दीन (नाशिक), अलका भटकर (भुसावळ) आणि शेख फरजाना अब्दुल अजीज (नाशिक) अशा १० शिक्षकांना स्मार्ट टीचर म्हणून गौरवण्यात आले. राष्ट्रीय स्तरावरील संस्थेने गौरव केल्याबद्दल सर्वांचे स्वागत होत आहे.