दोन दिवसात १०० ते १२५ कोटींचा सुवर्ण व्यवसाय ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:15 AM2021-03-14T04:15:47+5:302021-03-14T04:15:47+5:30

जळगाव : कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी व्यापाऱ्यांनीही पुढाकार घेत सलग दुसऱ्या दिवशी आपली दुकाने बंद ठेवली. जनता कर्फ्यूमुळे बाजारपेठेतील ...

100 to 125 crore gold business stalled in two days | दोन दिवसात १०० ते १२५ कोटींचा सुवर्ण व्यवसाय ठप्प

दोन दिवसात १०० ते १२५ कोटींचा सुवर्ण व्यवसाय ठप्प

Next

जळगाव : कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी व्यापाऱ्यांनीही पुढाकार घेत सलग दुसऱ्या दिवशी आपली दुकाने बंद ठेवली. जनता कर्फ्यूमुळे बाजारपेठेतील कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले असून सुवर्णनगरीतील सुवर्णव्यवसायातील १०० ते १२५ कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे.

कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १२ ते १४ मार्च दरम्यान जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. १५ मार्च रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू लागू असणार आहे.

आर्थिक उलाढाल शून्यावर

जनता कर्फ्युची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने व्यापारी बांधवांनीही करोडो रुपयांच्या उलाढालीचा विचार न करता आपली दुकाने बंद ठेवली. यात कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल थांबली आहे. जळगाव शहर हे सोने व चांदी, धान्य, डाळींच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. शहरात दररोज बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार होत असतात. परंतु, जनता कर्फ्युमुळे सर्वच व्यवहार ठप्प आहे. शहरातील दाणा बाजार, सराफ बाजार तसेच मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये काम करणारा मजूरवर्ग देखील जनता कर्फ्युमुळे घरी बसून आहे.

सराफ बाजारात १०० ते १२५ कोटींची उलाढाल ठप्प

जळगावातील सोने देशभरात प्रसिद्ध आहे. याठिकाणी सुमारे २२५ ते २५० सराफ व्यावसायिक आहेत. जळगावात दररोज ५० ते ६० कोटी रुपयांची उलाढाल होत असते. जनता कर्फ्युमुळे दोन दिवसात १०० ते १२५ कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. रविवारीदेखील जनता कर्फ्यू लागू असणार आहे. सराफ बाजारात अलीकडे रविवारीदेखील व्यवहार सुरू असतात. मात्र, जनता कर्फ्युमुळे रविवारीही व्यवहार होणार नाहीत. त्यामुळे ठप्प झालेल्या उलढालीचा आकडा हा वाढण्याची शक्यता आहे.

धान्य बाजारातही उलाढाल थांबली

जळगावातील दाणाबाजार हा किराणा तसेच धान्य मालाच्या खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी दररोज कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार होत असतात. मात्र, जनता कर्फ्युमुळे दाणा बाजारातील सुमारे २५० ते ३०० व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवली आहेत. जळगावात बाहेरून येणाऱ्या मालाची आवकदेखील थांबली आहे. या माध्यमातून दाणा बाजारात देखील गेल्या दोन दिवसात सुमारे १०० कोटी रुपयांची उलाढाल थांबली आहे.

जळगावात दररोज ५० ते ६० कोटी रुपयांची उलाढाल होत असते. जनता कर्फ्युमुळे दोन दिवसात १०० ते १२५ कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. रविवारीही जनता कर्फ्यू असल्याने त्यादिवशीही दुकाने उघडणे शक्य नाही.

- स्वरुप लुंकड, सचिव, जळगाव सराफ बाजार असोसिएशन.

Web Title: 100 to 125 crore gold business stalled in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.