‘शतप्रतिशत’चा अट्टाहास सामान्यांच्या मुळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:45 PM2018-07-24T12:45:40+5:302018-07-24T12:46:04+5:30
‘शतप्रतिशत भाजपा’ हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना वेठीस धरण्याचा मंत्री आणि लोकप्रतिनिधींचा प्रयत्न सामान्यांच्या मुळावर उठू पाहत आहे.
- मिलिंद कुलकर्णी
जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तिन्ही जिल्हा मुख्यालयाच्या पालिका भाजपेतर पक्षांकडे आहेत. नंदुरबारला सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न नुकताच फसला. आता जळगावसाठी साम, दाम, दंड, भेदाचा वापर सुरु आहे. धुळ्यात महापालिकेची कोंडी करण्याचा पुरेपूर प्रयत्न भाजपाचे मंत्री आणि लोकप्रतिनिधी करीत आहे. लोकशाही राज्यव्यवस्थेत सत्तासंपादनाला महत्त्व आहे. पण सामान्यांचे प्रश्न भिजत ठेवून , नाराजीचे वातावरण निर्माण होण्याची खेळी करुन पक्षाचे भले होईल, पण सामान्यांचे होणार नाही.
नंदुरबार पालिकेतील कथित गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश, धुळ्यातील १३६ कोटींच्या पाणीयोजनेचे भिजत घोंगडे, जळगावातील गाळेधारकांसंबंधी न्यायालयीन आदेशानंतरही ११ महिने कारवाई न होणे, हुडको कर्जप्रकरणी तोडगा न निघणे अशा बाबी केंद्र व राज्य सरकार सहेतूकपणे करीत आहे. लोकशाहीत विरोधी पक्ष शिल्लकच ठेवायचा नाही, हा हव्यास चुकीचा आहे. अर्थात अशी हुकूमशाही फार काळ टिकत नाही, हा इतिहास आहे. पण तोवर या संस्थांचे, शहराचे अपरिमित नुकसान होईल.
भारतीय जनता पार्टीला गल्ली ते दिल्ली अशी सर्वत्र सत्ता हवी आहे. संघटनात्मक भाषेत त्याला ‘शतप्रतिशत भाजपा’ असा हा संकल्प आहे. एखाद्या राजकीय पक्षाने पक्षवाढीसाठी संकल्प करण्यात कोणतेही गैर नाही. लोकशाही राज्यव्यवस्थेत प्रत्येक पक्षाला नैसर्गिक न्यायतत्त्वानुसार विस्ताराची पुरेशी व्यवस्था आहे. त्याला संवैधानिक अधिकार दिले गेलेले आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळापूर्वी स्थापन झालेला काँग्रेस पक्ष अद्यापही अस्तित्व टिकवून आहे. साम्यवादी, समाजवादी, हिंदुत्त्ववादी, मुस्लिम, अकाली, रिपब्लीकन पक्षांचे काही भागांमध्ये अस्तित्व आहे. जनसंघाचे भाजपामध्ये रुपांतर झाले. वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात तर मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-भाजपाचे राज्यात सरकार आले. जनतेने या सरकारला निवडून दिले. त्यांच्या चांगल्या कामांचे कौतुक केले. नंतर पुन्हा सत्तेबाहेरसुध्दा जनतेने बसविले तेही तब्बल १० ते १५ वर्षे. राजकारणात राजकीय पक्षांना यशापयश काही नवीन नाही. परंतु ‘शतप्रतिशत’चा अट्टाहास हा राजकारणात नवीन आहे. भजनलाल यांच्यामुळे ‘आयाराम-गयाराम’ संस्कृती प्रचलित झाली. त्याचा अंगीकार पूर्वी कॉंग्रेस करीत असे. आता भाजपा तीच री ओढत त्याचे चक्क समर्थन करीत आहे. अमळनेर पालिकेत भाजपाचा केवळ एक नगरसेवक निवडून आला. जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि विधान परिषद सदस्य स्मिता वाघ यांचा हा मतदारसंघ. त्यांनी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्यासह आघाडीच्या सर्व नगरसेवकांना भाजपामध्ये प्रवेश देऊन पालिकेवर भाजपाचा झेंडा फडकावला. वाघ यांचा हा आदर्श खरे तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश भोळे यांनी घ्यायला हवा होता. त्यांनी उगाच जळगाव महापालिकेसाठी उमेदवारांची आयात करण्याचा खटाटोप केला. त्यापेक्षा जे नगरसेवक निवडून येतील, त्यांनाच भाजपामध्ये घेतले असते तर राज्यभर ‘साम, दाम, दंड, भेदा’ची चर्चा झाली नसती. राष्टÑवादीचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत दोनदा जळगाव महापालिका निवडणुकीतील भाजपाच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडले. भाजपाने ज्यांना पावन करुन घेतले आहे, ते कुणाचेच नाही. उगवत्या सुर्याला नमस्कार करणारे आहेत, असा स्वानुभव पवारांनी प्रांजळपणे कथन केला. विनोद देशमुख यांच्यावरील हद्दपारीच्या नोटिसीने तर भाजपा आणि जिल्हा पोलीस दल राज्यभर टीकेचे धनी बनले.
भाजपाने चार वर्षातील केंद्र व राज्य सरकारच्या सत्तेचा फायदा घेत खान्देशात विकास गंगा आणली असती तर ‘आयाराम-गयाराम’ची गरज पडली नसती. खान्देशातून चार खासदार, त्यापैकी डॉ.सुभाष भामरे हे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री आहेत. दहा आमदार आहेत. गिरीश महाजन हे जलसंपदा मंत्री तर जयकुमार रावल हे पर्यटन व रोजगार हमी योजनामंत्री आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे जळगावचे पालकमंत्री आहेत. परंतु मंत्रिमंडळात खान्देशला चांगला वाटा मिळालेला असताना त्याप्रमाणात हे मंत्री न्याय देऊ शकलेले नाही. एकनाथराव खडसे आणि अनिल गोटे या भाजपाच्याच आमदारांनी चार वर्षात खान्देशावरील अन्यायाची कैफीयत वेळोवेळी मांडली आहे. घरच्या अहेराचा परिणामदेखील या मंत्र्यांवर होत नाही.
केंद्रात सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात सत्ता मागितली. राज्यात सत्ता दिल्यानंतर आता महापालिकेत सत्ता मागीतली जात आहे. महापालिकेत सत्ता आली नाही, तर जळगावच्या नावावर फुली मारणार आहात काय, हा प्रश्न भाजपाला विचारायला हवा. जळगाव महापालिकेची आर्थिक कोंडी करायची, ११ महिने पूर्णवेळ आयुक्त द्यायचे नाही आणि आता म्हणायचे बदल फक्त भाजपाच घडविणार...वा रे वा...
सत्ता कशी चंचल असते याचा एक जुना किस्सा आहे. काँग्रेस प्रबळ असताना रा.स्व.संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे जळगाव दौऱ्यावर स्वतंत्रपणे आले असताना त्यांच्या कार्यक्रमासाठी मैदान, सभागृह मिळविण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागत असत, असे अनुभव जुने स्वयंसेवक व कार्यकर्ते सांगतात. राजकारणातील अस्पृश्यता, असहिष्णुतेचे हे उदाहरण होते. परिणामी आणीबाणीनंतर भाजपा कार्यकर्ते पेटून उठले. पुढे जाऊन भाजपा संघटनदृष्टया सक्षम झाला. सर्वच संस्थांच्या सत्तास्थानी आला. भाजपा, अभाविपची राज्य, राष्टÑीय अधिवेशने जळगावात झाली. सरसंघचालक वर्षाआड येऊ लागले. कुठेही आडकाठी येण्याचा प्रश्नच राहिला नाही. परंतु आता भाजपा काँग्रेसच्या भूमिकेत शिरली आहे. भाजपाने विरोधकांना उमेदवारच मिळू द्यायचे नाही, म्हणून गेल्यावेळी आमदारांना तर आता मातब्बर नगरसेवकांना ओढले. सत्ता पक्ष आणि व्यक्तीला अंध बनवित असते , असे म्हणतात हेच खरे आहे.
खान्देशला काय मिळाले?
२०१४ च्या निवडणुकीत खान्देशने भाजपाला भरभरुन दान दिले. चार खासदार, दहा आमदार निवडून दिले. परंतु चार वर्षांचा हिशोब आता या खासदार, आमदारांकडून मागण्याची वेळ आली आहे. इंदोर-मनमाड रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्ग क्र.६ चे चौपदरीकरण, विमानसेवा, टेक्सटाईल पार्क, आदिवासीचा वनहक्काचा प्रश्न हे सगळे अद्याप सुटलेले नाहीत. बेरोजगारी, कायदा व सुव्यवस्था हे प्रश्न गंभीर झाले आहेत.