यंदाच्या अर्थसंकल्पात रस्त्यांच्या कामासाठी १०० कोटींची तरतुद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:17 AM2021-02-16T04:17:52+5:302021-02-16T04:17:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरातील रस्त्यांची समस्या बिकट झाली असून, रस्त्यांच्या समस्येने त्रस्त असलेल्या जळगावकरांच्या मनात सत्ताधारी व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरातील रस्त्यांची समस्या बिकट झाली असून, रस्त्यांच्या समस्येने त्रस्त असलेल्या जळगावकरांच्या मनात सत्ताधारी व प्रशासनाविरोधात तीव्र संताप आहे. हाच संताप दुर करण्यासाठी मनपाच्या यंदाच्या अर्थसंकल्पात नवीन रस्त्यांसाठी १०० कोटींची तरतुद करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांनी दिली आहे. तसेच मनपाकडून यंदाच्या अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ देखील होणार नसल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले असून, पुढील आठवड्यात प्रशासनाकडून अंदाजपत्रक सादर केले जाणार आहे.
अंदाजपत्रक सादर केल्यानंतर ३१ मार्चपूर्वी अंदाजपत्रकाला महासभेची परवानगी घेणे गरजेचे असते. त्यादृष्टीने प्रशासकीय स्तरावर अंदाजपत्रकाची तयारी पुर्ण झाली असून, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी अंदाजपत्रकाचा आढावा घेतला. मोठी आकडेवारी सादर न करता, करवसुली वाढवून मनपाची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी काही ठोस निर्णय यंदाच्या अंदाजपत्रकात घेतले जाण्याची शक्यता आहे. २२ रोजी मनपाचे अंदाजपत्रक सादर होण्याची शक्यता असून, त्यानंतर स्थायीच्या सदस्यांचा अभ्यास पुर्ण झाल्यानंतर स्थायी समितीचे सभापती काही त्रुटी दुर करून काही बदल सुचवणार आहेत. त्यानंतरच अंदाजपत्रकाला महासभेची मंजुरी दिली जाईल.
रस्त्यांचा कामांवर भर
शहरातील रस्त्यांबाबत मनपाकडून विशेष तरतुद केली जाणार आहे. आधी मनपा फंडातून एकूण ७० कोटींच्या नवीन रस्त्यांची तरतुद करण्यात आली आहे. यामध्ये ३० कोटींची वाढ करून रस्त्यांची कामे केली जाणार असल्याची माहिती सभापतींनी दिली. यासह मालमत्ताकराच्या रक्कमेत वाढ करण्याबाबत देखील विशेष योजना आणण्याची तयारी असल्याची माहिती मनपाच्या सुत्रांनी दिली आहे. यासह स्वच्छ शहराच्या दृष्टीने व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या सुविधा पुरविण्याबाबत देखील महत्वाचे निर्णय यंदाच्या अर्थसंकल्पात घेतले जाण्याची शक्यता आहे.