जळगावात समांतर रस्त्यासाठी १०० दिवस साखळी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:44 PM2018-11-12T12:44:24+5:302018-11-12T12:44:55+5:30
डीपीआरची प्रत व निविदा मंजूरीशिवाय आंदोलन मागे नाही
जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या समांतर रस्त्याच्या डीपीआर मंजुरीची प्रत मिळत नाही व कामाची निविदा मंजूर होत नाही, तोपर्यंत साखळी उपोषण मागे न घेण्याचा निर्धार समांतर रस्ते कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला. रविवारी संध्याकाळी कांताई सभागृह परिसरात झालेल्या या बैठकीत १०-१० दिवसांच्या १० टप्प्यात १०० दिवसांच्या आंदोलनाचे नियोजन करण्याविषयी निर्णय घेण्यात आला.
शहरातून जाणाºया महामार्गाच्या समांतर रस्त्याचे काम विविध आंदोलने करूनही मार्गी लागत नसल्याने समांतर रस्ते कृती समितीने १५ नोव्हेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता कांताई सभागृहाच्या परिसरात खुली चर्चा व बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी कृती समितीचे दिलीप तिवारी, डॉ. राधेश्याम चौधरी, माजी महापौर नितीन लढ्ढा, शिरीश बर्वे, फारुक शेख, अनंत जोशी, गजानन मालपुरे, अनिल कांकरिया, सुशील नवाल, विजय वाणी, डॉ. अस्मिता पाटील, सरिता माळी यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळी, शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. राधेश्याम चौधरी यांनी आंदोलनाची भूमिका सांगून सर्वच राजकीय पक्ष, संघटनांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. दिलीप तिवारी यांनी आंदोलनास पाठिंबा वाढत असून सोशल मीडियाद्वारे ३५ जणांनी पाठिंबा जाहीर करीत असल्याचे पत्र पाठविले असल्याची माहिती दिली.
राजकीय पक्षांकडून दिशाभूल समांतर रस्त्याअभावी अनेकांचे बळी गेले असून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अनेक आंदोलने झाली. त्यात मंत्री, राजकीय पुढाºयांनी केवळ आश्वासने दिली, मात्र त्यांची पूर्तता अद्यापही झालेली नसल्याबद्दल या वेळी नाराजी व्यक्त केली. १० जानेवारी २०१८ रोजीदेखील करण्यात आलेल्या आंदोलनानंतर त्यावर राजकीय पुढाºयांच्या समर्थकांनी टीका केली. मात्र या वेळी राजकीय पक्षांच्या टीकेचा विचार न करता आंदोलन सुरूच ठेवण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. इतकेच नव्हे आंदोलन सुरू होते त्याच वेळी नेमके समांतर रस्त्याचे कामे मार्गी लागत असल्याचे सांगितले जाते व तसे समर्थकांकडून संदेश पाठविले जातात आणि यातून वारंवार दिशाभूल केली जाते, असाही सूर या वेळी उमटला. मात्र या वेळी राजकीय पुढारी अथवा त्यांच्या समर्थकांच्या आश्वासनास बळी न पडता आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धारही बैठकीत करण्यात आला.
कार्यालयीन वेळेत १०० दिवस आंदोलन
१५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता साखळी उपोषणास सुरुवात होणार असून पहिल्या दिवशी महामार्गावर बळी गेलेल्यांचे नातेवाईक व कृती समितीचे सदस्य उपोषणास बसणार असल्याचे या वेळी निश्चित करण्यात आले. या सोबतच दररोज एक-एक संघटना उपोषणास बसणार असून त्या दिवसाची संपूर्ण जबाबदारी त्या संघटनेवर राहणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. १५ नोव्हेंबर पूर्वी १५ ते २४ नोव्हेंबर या दिवसात कोणत्या संघटना उपोषणास बसणार याचे नियोजन केले जाणार असून पुढील प्रत्येक १० दिवसांचे नियोजन प्रत्येक टप्प्यापूर्वी केले जाईल, असेही निश्चित करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यालयीन वेळेत सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५ या वेळेत हे साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.
अशोक पाटील ब्रॅण्ड अँबेसिडर
समांतर रस्त्याविषयी थेट पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना जाब विचारणारे अशोक पाटील हे आंदोलनाचे ब्रॅण्ड अँबेसिडर राहणार असून त्यांच्या उपस्थितीत पहिल्या दिवशी आंदोलनास सुरुवात होणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. अशोक पाटील यांनी पालकमंत्र्यांना विचारलेल्या जाब विषयी ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते.
सहभागी होणाचे आवाहन समांतर रस्ते कृती समितीच्यावतीने करण्यात येणारे हे आंदोलन अराजकीय असून यात विविध संघटना सहभागी तर होणारच आहे, सोबतच शहरवासीयांनीही सहभागी व्हावे, असे आवाहनही या वेळी करण्यात आले. बैठकी उपस्थित शहरवासीसांनीदेखील मनोगत व्यक्त केले.
या संघटनांचा पाठिंबा
जिल्हा मोटर्स ओनर्स अॅण्ड ट्रॉन्सपोर्ट एजंट असोसिएशन, लोकप्रिय फाउंडेशन, जिल्हा मणियार बिरादरी, कासार नवयुवक मंडळ, जैन स्पोर्टस् अकॅडमी, स्वराज निर्माण सेना, एल.के. फाउंडेशन, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (महानगर व जिल्हा), युवाशक्ती फाउंडेशन, शाक व्दिपीय ब्राह्मण नवयुवक मंडळ, सेवक सेवाभावी संस्था, जिल्हा फुटबॉल असोसिएशन, क्रिकेट असोसिएशन, हॉकी असोसिएशन, टेबल टेनिस असोसिएशन, त्वायक्वांदो असोसिएशन, बॅडमिंटन असोसिएशन, कॅरम असोसिएशन, व्हॉलिबॉल असोसिएशन, पॅरा आॅलम्पिक असोसिएशन, संदीप चौधरी व छाया पाटील, साहस फाउंडेशन यांनी पाठिंबा दिला असून तसे पत्र समितीकडे प्राप्त झाले असल्याची माहिती फारुक शेख यांनी दिली. बळी गेलेल्यांचे छायाचित्र लावणार महामार्गावर ज्यांचे बळी गेले आहे त्यांचे छायाचित्र उपोषणस्थळी फलकावर लावण्यात येणार असल्याचेही या वेळी निश्चित करण्यात आले. त्यामुळे ज्यांच्या कुटुंबातील व्यक्तीचा महामार्गावर बळी गेला आहे, त्यांनी कांताई सभागृहात छायाचित्र आणून देण्याचे आवाहनही करण्यात आले.