गाळेधारकांचा बंदला १०० टक्के प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:15 AM2021-03-06T04:15:59+5:302021-03-06T04:15:59+5:30
-१६ मार्केट १०० टक्के बंद -सोमाणी मार्केट देखील आज राहणार बंद - केमिस्ट असोसिएशनने दिला पाठींबा, दुपारी १२ वाजेपर्यंत ...
-१६ मार्केट १०० टक्के बंद
-सोमाणी मार्केट देखील आज राहणार बंद
- केमिस्ट असोसिएशनने दिला पाठींबा, दुपारी १२ वाजेपर्यंत बंद राहणार मेडिकल
- गाळेधारकांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट
-मनपा कारवाईवर ठाम, गाळेधारक संपावर ठाम
- पालकमंत्र्यांची आज घेणार भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांनी शुक्रवारपासून मनपा प्रशासनाच्या आदेशाविरोधात १६ मार्केटमधील १५०० गाळेधारकांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. पहिल्या दिवशी या बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाल्याचे पहायला मिळाले. तसेच जोपर्यंत मनपा प्रशासन गाळेधारकांच्या मागण्यांवर विचार करणार नाही तोपर्यंत सर्व मार्केट बंद ठेवले जाणार असल्याची माहिती गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे यांनी दिली.
मनपा प्रशासनाने मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांना बुधवारी थकीत भाड्यासह नुकसान भरपाईची एकूण रक्कम सोमवारपर्यंत भरण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात गाळेधारकांनी शुक्रवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. सकाळी १० वाजेच्या सुमारास १६ अव्यावसायीक मार्केटमधील गाळेधारक दुकानांजवळ जमा झाले. मात्र, एकही दुकान उघडले गेले नाही. सर्व १६ मार्केटमधील गाळे १०० टक्के बंद होते. लहान-मोठ्या अशा सर्व व्यावसायीकांनी या बंद मध्ये सहभाग घेतला. संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग काळे, राजस कोतवाल, युवराज वाघ,तेजस देपुरा, पंकज मोमाया, केशव नारखेडे, विलास सांगोरे, रिजवान जागीरदार, प्रकाश गागडाणी, सुजित किनगे, राजेश समदाणी, शिरीष थोरात, अमोल वाणी, मनीष बारी, अमित गौड सकाळी १० वाजता प्रत्येक मार्केटला भेट दिली.
पुढे जे होईल त्याला मनपा प्रशासन जबाबदार
जोपर्यंत महापालिका प्रशासन गाळेधारकांच्या मागण्या मान्य करत नाही तोवर बंद कायम राहणार असल्याचे गाळेधारकांनी सांगितले आहे. तसेच मनपाकडून कारवाई केल्यास गाळेधारक कोरोनाचा विचार न करता कुटुंबासह रस्त्यावर उतरतील, आणि या पुढे होणाऱ्या प्रत्येक समस्येला मनपा प्रशासनच जबाबदार राहिल असा इशारा देखील गाळेधारकांनी दिला आहे. दरम्यान, गाळेधारकांना शहरातील इतर मार्केटमधील गाळेधारकांकडून देखील पाठींबा मिळत आहे. केमिस्ट असोसिएशनने देखील गाळेधारकांना पाठींबा दिला असून, शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत मेडीकल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती डॉ.शांताराम सोनवणे यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन दिले. मनपाच्या आदेशानुसार गाळेधारकांनी सर्व नियमांची अंमलबजावणी करूनच गाळे बंद केले आहेत. मात्र, शासनस्तरावर गाळेधारकांचा सकारात्मक अहवाल पाठवावा तसेच मनपा प्रशासनाला योग्य ते आदेश देऊन होणारी कारवाई जोपर्यंत शासन निर्णय देत नाही तो पर्यंत स्थगित ठेवावी असे आदेश करावे अशी मागणी गाळेधारकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचीही शनिवारी गाळेधारक भेट घेणार आहेत. या भेटीत आपल्या मागण्या गाळेधारक पालकमंत्र्यांकडे ठेवणार आहेत.
कोट..
गाळेधारकांसोबत मंगळवारी झालेल्या बैठकीत थकीत भाडे भरण्याबाबत सूचना दिल्या होत्या. तसेच जर एकाचवेळी ही रक्कम भरू शकत नाही तरी पहिल्यांदा ५० टक्के रक्कम भरून काही मुदतीत उर्वरित रक्कम भरण्याचा सल्ला देखील दिला होता. मात्र, ही रक्कम अद्यापपर्यंत भरलेली नाही.
-सतीश कुलकर्णी, आयुक्त, मनपा