खान्देशातील १० हजार ग्राहक घेताहेत ‘गो-ग्रीन’ सेवेचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:13 AM2021-06-05T04:13:26+5:302021-06-05T04:13:26+5:30
महावितरण: सर्वाधिक साडेसहा हजार ग्राहक जळगाव जिल्ह्यातील जळगाव : पर्यावरण रक्षणासाठी महावितरणनेही एक पाऊल पुढे टाकले आहे. कागदी वीज ...
महावितरण: सर्वाधिक साडेसहा हजार ग्राहक जळगाव जिल्ह्यातील
जळगाव : पर्यावरण रक्षणासाठी महावितरणनेही एक पाऊल पुढे टाकले आहे. कागदी वीज बिलाऐवजी ग्राहकांना ई-मेल व एसएमएसवर बिल पाठविण्याची गो-ग्रीन योजना महावितरणने सुरू केलेली आहे. सध्या या योजनेचा खान्देशातील १० हजारांहून अधिक ग्राहक लाभ घेत असून, जळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक साडेसहा हजार ग्राहक याचा लाभ घेत आहेत.
छापील वीज बिलांसाठी मोठ्या प्रमाणावर कागद लागतो. हा कागद आणि पर्यायाने वृक्षतोड वाचावी या हेतूने महावितरणने काही वर्षांपूर्वी गो-ग्रीन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत छापील बिल नाकारून, केवळ ई-बिल घेणाऱ्या ग्राहकांना सुरुवातीला दरमहा ३ रुपये सवलत दिली जात होती. मात्र, ग्राहकांचा या योजनेला प्रतिसाद मिळण्याकरिता महावितरण प्रशासनाने कालांतराने या बिलावर दरमहा १० रुपये सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील २ लाख १९ हजार ८३७ ग्राहकांनी या योजनेसाठी आतापर्यंत नावनोंदणी केली आहे. यात खान्देशात १० हजार ८१ ग्राहकांनी गो-ग्रीनसाठी नोंदणी केली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील ६ हजार ५९६ ग्राहक असून, धुळे जिल्ह्यातील २ हजार ३२२, तर नंदुरबार जिल्ह्यातील १ हजार १६३ ग्राहकांचा समावेश आहे. ‘गो-ग्रीन’चा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी आपल्या वीज बिलावरील ‘गो-ग्रीन’ क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाइल ॲपद्वारे अथवा महावितरणच्या संकेत स्थळावर जाऊन करण्याचे आवाहन महावितरण प्रशासनाने केले आहे. दरम्यान, ‘गो-ग्रीन’चा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना महावितरणतर्फे वीज बिल तयार झाल्यावर ते तातडीने ई-मेलद्वारे देण्यात येत आहे.