जळगाव तालुक्यात १०२४ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:46 AM2021-01-08T04:46:23+5:302021-01-08T04:46:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, माघारीच्या दिवशी सोमवारी ५०६ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर १०२४ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, माघारीच्या दिवशी सोमवारी ५०६ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर १०२४ उमेदवार रिंगणात कायम राहिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. यात मोहाडी आणि डिकसाई या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. सोमवारी अर्ज माघारीच्या दिवशी तहसील कार्यालयाला यात्रेचे स्वरूप आले होते. प्रचंड गर्दीत ही प्रक्रिया पार पाडली. माघारीनंतर चिन्हे वाटप करण्यात आली.
सोमवारी रात्री दहा वाजेपर्यंत प्रभागनिहाय यादी अपडेट करण्याचे काम सुरूच होते. दरम्यान, अर्ज माघारीच्या दिवशी कोणाचाही कसलाही लेखी आक्षेप नोंदविण्यात आला नव्हता व निवडणूक शांततेत पार पडल्याचे तहसीलदार नामदेव पाटील यांनी सांगितले.
असे आहे चित्र
१६८ एकूण प्रभाग
४६३ एकूण जागा
१५३० उमेदवारांचे अर्ज वैध
५०६ उमेदवारांची माघार
१०२४ उमेदवार रिंगणात
वेळ संपली अन् गोंधळ
माघार घेण्यासाठी तीन वाजेची वेळ देण्यात आली होती, त्यानंतर पोलिसांनी तहसील कार्यालयाचे गेट बंद केले होते. त्यावेळी अनेकांची धावपळ उडाली. आत येण्यासाठी ग्रामस्थ गर्दी करीत असल्याने अखेर पोलीस व ग्रामस्थांमध्ये धक्काबुक्की झाली. काही काळ हा गोंधळ सुरू होता. यावेळी प्रचंड गर्दी उसळली होती.
अरे आला आला आला...
माघारीसाठी जुळवाजुळव, मनधरणी आदी बाबींचे चित्र तहसीलला निदर्शनास येत होते. अनेकांनी माघारीचा शब्द देऊनही ते न आल्याने उमेदवारांच्या चेहऱ्यावरील रंग उडाला होता. अशा वेळी वेळ निघत जात असताना चिंता वाढली होती. अशातच माघार घेणार गेटवरून दुरून दिसताच अरे आला आला आला.. असा एकच नारा आनंदात दिला जात होता. अनेक जण तर गेटवर चढून आवाज देऊन माघार घेण्यासाठी उमेदवारांना बोलवत होते. यावेळी अनेक महिला आपल्या लहान बाळांना घेऊन या ठिकाणी आलेल्या होत्या.
४३ ग्रामपंचायती, २४ टेबल
तहसील कार्यालयात तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी २४ टेबल ठेवण्यात आले असून, यात प्रत्येक टेबलवर किमान दोन ग्रामपंचायतींची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येत होती. अगदी सुरुवातीला शिरसोली आणि नशिराबाद यांच्याबाबत प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
चिन्हासाठी आग्रह
माघारीनंतर चिन्ह वाटप करण्यात आले. यासाठी गावनिहाय, वाॅर्डनिहाय उमेदवारांना बोलावले जात होते. अनेकांनी नवीन चिन्हामुळे आश्चर्य व्यक्त केले. अनेकांनी तातडीने चिन्ह मिळताच फोनवरून प्रचारास सुरुवात देखील केल्याचे चित्र तहसील कार्यालयात होते.
जागा कमी अन् गोंधळ अधिक
४३ गावांच्या निवडणूक माघारीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी अत्यंत कमी जागा असल्याने प्रचंड गर्दी आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. जागा नसल्याने अनेकांनी तर ट्रॅक्टरवर उभे राहून ही प्रक्रिया पाहली. पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली होती. अनेक गावांसाठी तहसीलच्या मागील बाजूस टेबल ठेवण्यात आले होते. गावे अधिक असल्याने या छोट्याशा जागेत ही प्रक्रिया राबवायला नको होती, असाही सूर अनेकांकडून उमटत होता. विशेष बाब म्हणजे ५० टक्के लोक हे विनामास्क वावरत होते.
चिंचोलीत दोन भाऊ समोरासमोर
चिंचोली येथे ११ जागांसाठी निवडणूक लढवली जात आहे. यात वॉर्ड एकमध्ये प्रकाश नामदेव पवार आणि देविदास नामदेव पवार हे दोघे भाऊ एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, या वॉर्डामधून गेल्या निवडणुकीला ज्योती संजय वराडे या विजयी झाल्या होत्या. त्या पुन्हा निवडणूक लढत आहेत.