१०५७ रूग्णांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 12:13 PM2020-06-18T12:13:40+5:302020-06-18T12:14:10+5:30
तीन महिन्याच्या बालिकेचा यशस्वी लढा : डॉ.पाटील रुग्णालयातील पहिली केस
जळगाव : एकीकडे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असताना गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनावर मात करणा-या रूग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक व समाधानाची बाब आहे.
दरम्यान, बुधवारी दिवसभरात जिल्ह्यातील ११० कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्त रूग्णांची संख्या १ हजार ५७ इतकी झाली आहे.
कोरोनावर मात केलेले रूग्णांमध्ये तीन महिन्याच्या बालिकेपासून ९२ वर्षीय आजीचा समावेश आहेच. शिवाय विविध व्याधी व जुने आजार असलेलेही रूग्ण आहे. यामध्ये डॉ उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि रूग्णालयातील काही खाटा कोविड रूग्णांसाठी अधिग्रहीत केल्यानंतर येथे उपचार केलेल्या तीन महिन्याची बालिका या रूग्णालयातील पहिली कोरोनामुक्त ठरली आहे हेही विशेष.
या रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्ह्यातील विविध कोविडसेंटरमधून निरोप देण्यात आला. तिच्या सेवेसाठी तैनात ्रअसलेल्या रुग्णालयातील परिचारिका, डॉक्टर, वॉर्डबॉय व इतरांनी बालिका व तिच्या आईला आनंदाने टाळ्या वाजवून निरोप दिला.
जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा सामान्य रूग्णालय व डॉ उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि रूग्णालयातील काही बेडस् कोविड रूग्णांसाठी अधिग्रहीत केले आहे. गणपती व गोल्ड सिटी हे हॉस्पिटल सर्व सुविधांसह कोरोना बाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी अधिग्रहीत केली आहे. शिवाय जिल्ह्यातील ३३ हॉस्पिटलचा समावेश महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत केला आहे. याठिकाणी नॉनकोविड रूग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी यावे लागू नये तसेच रुग्णांना तातडीने व वेळेवर उपचार मिळावेत याकरिता जिल्ह्याच्या विविध ठिकाणी ७८ कोविड केअर सेंटर ३६ कोविड हेल्थ सेंटर तर २४ कोविड हेल्थ हॉस्पिटल तयार करण्यात आली आहे.
याठिकाणी रुग्णांचे स्क्रीनिंग करणे, संशयित रूग्णांना दाखल करून घेणे, त्यांचेवर उपचार करणे, आवश्यकता भासल्यास क्वारंटाईन करणे, स्वॅब घेणे, पॉझिटिव्ह रुग्णांवर तातडीने व वेळेवर उपचार होत असल्याने आतापर्यंत जिल्ह्यातील १०५७ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहे.
तालुकनिहाय कोरोनामुक्त रूग्ण संख्या
जळगाव शहर- २२५
जळगाव ग्रामीण- २२
भुसावळ- १७६
अमळनेर-१३२
चोपडा-८०
पाचोरा-२८
भडगाव- ७८
धरणगाव- ३४
यावल -४५
एरंडोल- ३१
जामनेर-३७
रावेर-७४
पारोळा- ६३
चाळीसगाव- १६
मुकताईनगर -७
बोदवड -८