बाजारभावानुसार १०८ कोटी ७७ लाखांच्या नुकसानीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:14 AM2021-05-29T04:14:27+5:302021-05-29T04:14:27+5:30
रावेर : केळीच्या बाजारभावाने मुसंडी मारली असतानाच वादळी पावसाच्या तांडवाने रुद्रावतार धारण केल्याने आज १ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटल ...
रावेर : केळीच्या बाजारभावाने मुसंडी मारली असतानाच वादळी पावसाच्या तांडवाने रुद्रावतार धारण केल्याने आज १ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटल दराने कापली जाणारी परिपक्व केळी जमीनदोस्त झालेली केळी ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल दरात पडीच्या दरात कापली गेली. अपरिपक्व मालाच्या केळीबागा मात्र मातीमोल झाल्या. उन्मळून पडलेली केळीबागेतील खोडं बांधावर वा शेताबाहेर फेकण्यासाठी शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. आजच्या १ हजार ४५० रू. प्रतिक्विंटलचा चालू बाजारभाव व ६०० रु. प्रतिक्विंटल उत्पादन खर्च गृहीत धरला असता प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार ७५८ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्यास किमान १०८ कोटी ७७ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
रावेर तालुक्यातील तापीकाठच्या खिर्डी खुर्द, खिर्डी बु, रेंभोटा, वाघाडी, शिंगाडी, धामोडी, सुलवाडी, भामलवाडी, कोळदा, ऐनपूर, कांडवेल, विटवे, निंबोल, व निंभोरासीम शिवारातील ७५७ हेक्टर क्षेत्रातील केळी बागा जमीनदोस्त होऊन ३० कोटी ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे.
तथापि, आजच्या १ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटल भावानुसार दरनिश्चिती झालेल्या केळीबागा जमीनदोस्त झाल्याने, त्याच केळीबागेतील सरसकट परिपक्व केळीमाल ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल दरात आज कापला गेल्याचे बळीराजाचे दुर्दैव आहे.
एकंदरीत, तालुका प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार, ७५८ हेक्टर क्षेत्रातील केळी बागा बाधित झाल्याचे गृहीत धरल्यास किमान हेक्टरी ७० टन उत्पादनक्षमता व १०० रुपये प्रतिखोड उत्पादन खर्च पाहता आजच्या १ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटल दराप्रमाणे ५३ हजार ६०० क्विंटल केळीमालाची १०८ कोटी ७७ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज शेतकरीवर्गातून व्यक्त केला जात आहे. किंबहुना बाधित क्षेत्र वृद्धिंगत झाल्यास त्यापेक्षा जास्त नुकसानीचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
३४ हजार खोडांची केळीबाग ऐन कापणीवर होती. त्यापैकी फक्त १६ हजार केळी खोडे कापली गेली असून उर्वरित केळीमाल मातीमोल झाला आहे.
-मुरलीधर चौधरी, केळी उत्पादक शेतकरी, वाघाडी, ता. रावेर