जळगावकर भारी...! एकाच वर्षात ११ लाख ८३ हजार वाहने दारी, कोविडनंतर चारचाकी घेणाऱ्यांची संख्या वाढली
By विलास बारी | Published: September 9, 2023 06:37 PM2023-09-09T18:37:28+5:302023-09-09T18:44:38+5:30
यात तब्बल ७१ हजार पेट्रोल व डिझेलच्या कारचा समावेश आहे.
जळगाव : वाढलेले उत्पन्न आणि कोविडनंतर स्वतंत्र वाहनाची निर्माण झालेली गरज यामुळे जळगाव जिल्ह्यात तब्बल एका वर्षात ११ लाख ८३ हजार वाहनांची खरेदी व विक्री झाली आहे. यात तब्बल ७१ हजार पेट्रोल व डिझेलच्या कारचा समावेश आहे.
पूर्वी घरासमोर वाहन हे श्रीमंतीचे लक्षण मानले जायचे. मात्र, कोरोनानंतर स्वत:चे वाहन असावे, ही गरज झाल्यामुळे अनेकांकडून रोखीने, तसेच बँक लोनच्या माध्यमातून नागरिकांकडून दुचाकी व चारचाकी खरेदी केली जात आहे. जळगाव प्रादेशिक परिवहन कार्यालयात सन २०१९ ते २०२३ या कालावधीतील वाहनांच्या नोंदणीच्या आकडेवारीवरून सन २०१९ मध्ये वर्षाला ९ लाख ४८ हजार १९ वाहनांची विक्री होत होती. ती २०२३ मध्ये ११ लाख ८३ हजार ८५२पर्यंत पोहोचली आहे. या माध्यमातून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूलदेखील उपलब्ध होत आहे.
कमी ‘ईएमआय’चा पर्याय -
विविध संस्था, बँकांकडून कमी ईएमआयचे आमिष दाखविले जात आहे. वाहन ही काळाची गरज असल्याचे ओळखून अनेकजण कर्ज काढून कमी ईएमआयवर दुचाकी, चारचाकी वाहने खरेदी करीत आहेत.
कोरोनानंतर चारचाकींची संख्या वाढली -
कोरोना काळात दळणवळणाच्या सुविधाही प्रभावित झाल्या होत्या. त्यामुळे प्रवासात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. सामाजिक कार्यातील सहभाग, तसेच नातेवाइकांच्या भेटीगाठींवर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे अनेकांनी स्वत:चे वाहन खरेदी करण्याचा पर्याय निवडला होता. २०१९ मध्ये ४५ हजार ७२९ मोटार कारची विक्री झाली होती. २०२३ मध्ये हेच प्रमाण ७१ हजार २०३पर्यंत पोहोचले आहे.
दुचाकीची किंमत ८० हजारांपासून, चारचाकी ५ लाखांपासून पुढे -
दुचाकी व चारचाकी वाहनांची विक्री वाढल्यामुळे उत्पादक कंपन्यांनीदेखील किमतींमध्ये वाढ केली. सध्या दुचाकीची किंमत ही ८० हजारांच्या पुढे, तर चारचाकी वाहनाची किंमत ही ५ लाखांच्या पुढे आहे.
९५ टक्के ग्राहकांकडून ‘ईएमआय’चा वापर
दुचाकी : दुचाकी खरेदीसाठी अनेक बँका, विविध कपंन्यांकडून कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाहन खरेदी करणाऱ्यांना कमीत कमी ईएमआय आकारला जातो. त्यामुळे ९० ते ९५ टक्के ग्राहक दुचाकी ही ईएमआयवर खरेदी करतात.
चारचाकी : चारचाकी वाहनांसाठी कमीत कमी ईएमआयचा पर्याय उपलब्ध आहे. ही सुविधा परवडणारी वाटत असल्याने अनेकजण चारचाकी खरेदी करीत असतात. जिल्ह्यात २०२२-२३ या वर्षात ७१ हजार २०३ कारची खरेदी झाली आहे.
जिल्ह्यातील वाहने
वाहन २०१९ --२०२३--- तुलनात्मक वाढ
दुचाकी ७५५१९६ --९३३९६९--१७८७७३
कार ४५७२९--७१२०३--२५४७४
ऑटोरिक्षा ३१४२४--३३१६५--१७४१
मिनी बस ६१६--६७५--५९
स्कूल बस ५५० --६९६--१४६
रुग्णवाहिका २५६--३४३--८७
ट्रक, लाॅरी १००६५ --१४८१२ --४७४७
डिलिव्हरी व्हॅन २६०३८--३२९७६--६९३८
ट्रॅक्टर ३६८१२-- ५१९५१--१५१३९
इतर वाहने १८८६ -- २६३९--७५३