विम्याचे ४४ लाख देण्यासाठी उकळले पावणे अकरा लाख
By विजय.सैतवाल | Updated: June 21, 2024 22:29 IST2024-06-21T22:28:46+5:302024-06-21T22:29:00+5:30
ऑनलाईन फसवणूक : प्रोसेसिंग व ट्रॉन्सफर फीच्या नावाखाली घेतली रक्कम

विम्याचे ४४ लाख देण्यासाठी उकळले पावणे अकरा लाख
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : वडिलांच्या नावे असलेली विम्याची ४४ लाख रुपयांची रक्कम देण्यासाठी रेल्वे विभागातील कर्मचाऱ्याची १० लाख ७४ हजार १९४ रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ८ मार्च ते २० जूनदरम्यान घडला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ येथे रेल्वेमध्ये टेक्निशीयन म्हणून कार्यरत असलेले प्रसाद किशोर कुलकर्णी (३६, रा. तुळशीनगर, भुसावळ) यांना ८ मार्च रोजी मोबाईलवर संपर्क साधून त्यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या विम्याची ४४ लाख रुपयांची रक्कम द्यायची असल्याचे सांगण्यात आले. यात भालचंद्र व रामचरण असे नावे सांगणाऱ्या दोन जणांनी भारतीय राजमुद्रा असलेले बनावट कागदपत्रे पाठवून कुलकर्णी यांचा विश्वास संपादन केला.
ही रक्कम मिळण्यासाठी प्रोसेसिंग फी, ट्रान्सफर फी असे वेगवेगळे कारणे सांगून वेळोवेळी पैशाची मागणी केली. त्यात वडिलांचे निधन झाले असल्याने कदाचित त्यांनी विमा काढला असावा, असे कुलकर्णी यांना वाटले. त्यामुळे समोरील व्यक्तींनी वेळोवेळी वेगवेगळ्या फीच्या नावाखाली वेगवेगळ्या बँक खात्यावर एकूण १० लाख ७४ हजार १९४ रुपये स्वीकारले.
एवढी फी देऊनही कोणतीही रक्कम मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने प्रसाद कुलकर्णी यांनी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून भालचंद्र व रामचरण नाव सांगणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहेत