चाळीसगाव पालिकेत प्रत्येक समितीत ११ सदस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 10:53 PM2019-01-03T22:53:23+5:302019-01-03T22:53:46+5:30

नगरपालिका विषय समिती सदस्यांची निवड

11 members in each committee in Chalisgaon municipality | चाळीसगाव पालिकेत प्रत्येक समितीत ११ सदस्य

चाळीसगाव पालिकेत प्रत्येक समितीत ११ सदस्य

Next

चाळीसगाव : नगरपरिषदेच्या विषय समिती सदस्य संख्येसह सदस्यांची निवड गुरुवारी झालेल्या विशेष सभेत करण्यात आली. पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार कैलास देवरे होते. त्यांनीच समिती सदस्यांचे नावे घोषीत केली. दरम्यान, भाजपाचे गटनेते राजेंद्र चौधरी यांच्या विरोधात नगराध्यक्षांसह १३ सदस्यांनी बंड करीत जिल्हाधिकाऱ्यांकडे बुधवारी गटनोंदणी केली. यावेळी राजेंद्र चौधरी अनुपस्थितीत होते. यानंतर गटनेतेपदी संजय रतनसिंग पाटील यांची निवड करण्यात आली. गुरुवारच्या सभेचा पक्ष व्हीप पाटील यांच्या नावानेच सदस्यांना देण्यात आला. गटनेता बदविल्याने शहरात चर्चेला उधाण आले असून राजेंद्र चौधरी यांच्याविषयी पक्षाच्या काही नगरसेवकांनी चौधरी हे विरोधकांच्या सुरात सूर मिसळतात, अशी तोंडी तक्रार आमदार उन्मेष पाटील यांच्याकडे केली होती. राजेंद्र चौधरी हे पालिकेत सतत सातव्यांदा निवडून आले असून उपनगराध्यक्ष पदासाठीही ते इच्छुक होते. मात्र त्यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. विरोधी गटनेता ते सत्ताधारी भाजपा गटनेता असा राजेंद्र चौधरी यांचा प्रवास राहिला आहे.
पक्षीय बलानुसार एकुण ३३ सदस्यांपैकी भाजपा पाच, शविआ पाच तर शिवसेनेचा प्रत्येकी एक सदस्य अशा ११ सदस्यांची निवड प्रत्येक समितीत करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा आशालता चव्हाण, उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण, मुख्याधिकारी अनिकेत शविआचे गटनेते राजीव देशमुख, भाजपाचे नवनियुक्त गटनेते संजय रतनसिंग पाटील यांच्यासह सर्व ३३ व स्वीकृत चार नगरसेवक उपस्थित होते.
चाळीसगाव नगरपरिषदेत लोकनेत अनिलदादा देशमुख शहर विकास अघाडीची सदस्य संख्या १७ होती. मात्र मध्यंतरी दोन सदस्यांवर आपात्रतेची कारवाई झाल्याने त्यांची संख्या १५वर आली आहे. भाजपाचे एकुण १४ सदस्य असून शिवसेनेच्या दोन व अपक्ष दोन सदस्यांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे. लोकनियुक्त नगराध्यक्षा आशालता चव्हाण भाजपाच्याच असल्याने पालिकेत त्यांचे बहुमत आहे.
गुरुवारी दुपारी १२ वाजता समिती सदस्य संख्या व निवडीसाठी घेण्यात आलेल्या सभेत भाजपाने बहुमताने मागणी केल्यानुसार सार्वजनिक बांधकाम, शिक्षण समिती, स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य, पाणी पुरवठा, नियोजन व विकास, महिला व बालकल्याण समिती अशा सहा समित्यांमध्ये भाजपाचे पाच, शविआचे पाच आणि शिवसेनेच्या एका सदस्याची निवड करण्यात आली.
सभापतींची निवडही लवकरच
सहा विषय समित्यांच्या सदस्यांची निवड झाल्याने येत्या आठ ते दहा दिवसात सभापतींच्या निवडीसाठी जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार सभा बोलविण्यात येईल. असे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी सांगितले.
स्थायी समितीत तिघांची निवड
स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष हे नगराध्यक्ष असतात. भाजपाने या समितीत फेरबदल करीत यावेळी घृष्णेश्वर पाटील यांची निवड केली असून पाटील हे भाजपाचे शहराध्यक्षही आहेत. शविआतर्फे गटनेते राजीव देशमुख, उपनेते सुरेश स्वार यांची फेर निवड झाली आहे.
भाजपा गटनेतेपदी संजय पाटील
२०१६च्या निवडणुकीत पहिल्यांदाच निवडून आलेल्या संजय रतनसिंग पाटील यांची भाजपा गटनेतेपदी निवड झाली आहे. पाटील हे जामदा गावचे असून येथे त्यांनी गावपातळीवर नेतृत्व केले. त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद व पंचायत समितीत निवडून आल्या होत्या.
आमदार उन्मेष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन कामकाज करु. शतक महोत्सवी परंपरा असणा-या पालिकेच्या गटनेतेपदी निवड झाल्याचा आनंद आहे. कामकाजाची दिशा शहरवासियांच्या वचनपूर्तिसाठी असेल. पालिकेतील प्रशासनन गतीमान केले जाईल.
- संजय रतनसिंग पाटील, भाजपा गटनेता, नगरपरिषद, चाळीसगाव.

गटनेता बदलविण्याच्या प्रक्रियेत मला विश्वासात घेतले नाही. पालिकेत होत असलेल्या बेकायदेशीर कामांना नेहमीच विरोध केला. कामे पारदर्शी होत नसल्याने सभागृहात आवाज उठविला. ठेकेदारांचा हस्तक्षेप वाढला आहे. विरोधकांसोबत कधीच हातमिळवणी केली नाही. जनतेसाठी काम हेच सूत्र ठेवले आहे.
- राजेंद्र चौधरी, नगरसेवक, नगरपरिषद चाळीसगाव.

Web Title: 11 members in each committee in Chalisgaon municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव