पारोळा तालुक्यात 11 गावांना पाणी टंचाईच्या झळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2017 01:45 PM2017-04-07T13:45:49+5:302017-04-07T13:45:49+5:30
चार गावांना टँकरसाठी तर सात गावांना विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव संबंधित गावांच्या ग्रामपंचायतीकडून पंचायत समितीकडे आला आहे.
पारोळा, जि. जळगाव, दि. 7 - तालुक्यातील जलाशये आटत असल्याने अनेक गावांना पाणी टंचाईचा सामाना करावा लागत आहे. मे महिना उजाडण्यापूर्वीच तालुक्यात 11 गावांना पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहे. चार गावांना टँकरसाठी तर सात गावांना विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव संबंधित गावांच्या ग्रामपंचायतीकडून पंचायत समितीकडे आला आहे.
खेडीढोक, मंगरुळ, मोहाडी, दहीगाव, हणमंतखेडे या चार गावांना तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या चारही गावांचा पाणी टँकरसाठीचा प्रस्ताव ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. तर जिराळी, मोरफळ, मोरफळी, अंबापिंप्री, चिखलोद, कोळपिंप्री, वडगाव, शेळावे खु. या सात गावांसाठी खाजगी विहीर अधिग्रहीत करण्यासाठी प्रस्ताव पंचायत समितीकडे आला. मंजुरीसाठी पारोळा तहसीलदारांकडे पाठविण्यात आला आहे.
तालुक्यात बोरी आणि म्हसवे वगळता सर्वच लघु प्रकल्प कोरडेठाक झाले आहे. यावर्षी टंचाईग्रस्त भागांना पाण्यासाठी टँकर कुठून भरावे ही मोठी समस्या भेडसावणार आहे.
तालुक्यातील भोकरबारी, कंकराज, इंदासी, खोलसर, सावरखेडे ही पाचही लघु धरणे शून्य साठय़ात आहे. या धरणांवर अनेक गावांचा पाणी पुरवठा अवलंबून आहे.