वर्षभरात ११३ गर्भवती कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:14 AM2021-04-13T04:14:51+5:302021-04-13T04:14:51+5:30
लोकमत न्यू नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पहिल्या लाटेत अर्थात एप्रिल २०२० पासून वर्षभरात कोविड रुग्णालयात ११३ गर्भवती मातांना कोरोनाची ...
लोकमत न्यू नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पहिल्या लाटेत अर्थात एप्रिल २०२० पासून वर्षभरात कोविड रुग्णालयात ११३ गर्भवती मातांना कोरोनाची लागण झाल्याने दाखल करण्यात आले होते. यात त्यांची सुखरूप प्रसूती करण्यात स्थानिक डॉक्टरांना यश आले हाेते. गेल्या लाटेत केवळ दोन बाळांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. ही दोन्ही बाळे व त्यांच्या माता या रुग्णालयातून बऱ्या होऊन घरी परतल्या होत्या.
गेल्या लाटेत गर्भवती महिलांना बाधा होण्याचे प्रमाण कमी होते. दुसऱ्या लाटेत मात्र हे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यासह लहान बाळांमध्येही गंभीर लक्षणे समोर येत आहेत. गेल्या वर्षी कोरोनाकाळात कोविड रुग्णालयात ६३ बाधित गर्भवती महिलांचे सिझेरीयन करण्यात आले होते, तर ५० महिलांची सामान्य प्रसूती झाली होती. प्रसूती झाल्यानंतर बाळांचीही दुसऱ्या दिवशी तातडीने तपासणी करण्यात येत होती. यात दोन बाळे बाधित आढळून आली होती. मृत्यूचे प्रमाण रोखण्यात गेल्या वर्षभरात स्थानिक डॉक्टरांना मोठे यश आले आहे.
दोन महिलांचा मृत्यू
या दोन लाटांमध्ये पहिल्या लाटेत कोविड रुग्णालयात एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या लाटेत एका महिलेच्या मृत्यूची नोंद आहे. ऑक्सिनची पातळी खालावल्यानंतर या महिला रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. गंभीर अवस्थेत दाखल झाल्या होत्या. त्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न डॉक्टरांकडून झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, ऑक्सिजन पातळी अत्यंत कमी असल्याने अखेर या महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
अन्य गर्भवती बाळांसह सुखरूप
दोन महिलांचे मृत्यू झाले, मात्र अन्य सर्व महिला वेळेवर रुग्णालयात दाखल झाल्याने बाळ व सर्व माता सुखरूप बऱ्या होऊन घरी गेल्या. मात्र, बाळाचा जन्म झाल्यापासून पुढील दहा दिवस माता व बाळाला वेगवेगळे ठेवले जायचे. हा काळ थोडा कठीण असल्याचे डॉक्टरही सांगतात. दुसऱ्या लाटेत मात्र बाळांचे गंभीर होण्याचे प्रमाण थोडे वाढले आहे. दोन चिमुकल्यांना तर ऑक्सिनचा पुरवठाही करावा लागला होता. मात्र, त्यांना वाचविण्यात डॉक्टरांच्या टीमला यश आले.
एप्रिल ते डिसेंबर २०२० : ११३ गर्भवती बाधित
मार्च ते एप्रिल २०२१ : ३० गर्भवती बाधित
काय काळजी घ्यावी?
गर्भवती मातांनी कोविडच्या काळात अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. कोविडपासून बचावासाठी मास्क वापरणे, गर्दी टाळणे, हात स्वच्छ ठेवणे हे नियम तर आहेतच, मात्र आहारावर अधिक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. यासह कोविडबाधित आढळल्यानंतर डॉक्टरांनी सांगितल्यानुसार पूर्ण उपचार घेणे, कोविडमधून बरे झाल्यानंतरही आहारात प्रथिने, लोहयुक्त अन्नाचे सेवन करणे अधिकाधिक काळजी घेणे, मानसिक तणाव न घेणे, मन प्रसन्न ठेवणे, आधी बाधित होतो म्हणजे नंतर होणार नाही, असा गैरसमज न बाळगता नियमित सुरक्षिततता बाळगणे, कॅल्शियम व प्रोटीनचे सेवन करणे.
कोविड रुग्णालयात गेल्या वर्षभरात योग्य उपचार, वेळेवर योग्य निर्णय, डॉक्टरांचे पूर्ण निरीक्षण या बाबींमुळे मातांना आम्ही गंभीरच होऊ दिले नाही. वेळेवर उपचार झाल्याने सुखरूप माता व बालके घरी गेली. दुसऱ्या लाटेत गर्भवती बाधित होण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे.
गर्भवती मातांनी या काळात भीती न बाळगता पुरेशी काळजी घ्यावी, डॉक्टरांनी सांगितलेले उपचार वेळेवर व पूर्ण घ्यावे.
- डॉ. संजय बनसोडे, विभागप्रमुख, स्त्री रोग व प्रसूतीतज्ज्ञ