जळगाव ग्रामीणमध्ये ११५ बाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:17 AM2021-04-23T04:17:55+5:302021-04-23T04:17:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत होता. मात्र, यात रुग्ण बरे होण्याचे ...

115 victims die in rural Jalgaon | जळगाव ग्रामीणमध्ये ११५ बाधितांचा मृत्यू

जळगाव ग्रामीणमध्ये ११५ बाधितांचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जळगाव तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत होता. मात्र, यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक असून ७८ गावांपैकी १९ गावांचा रिकव्हरी रेट हा पूर्ण १०० टक्के आहे. दरम्यान, पहिल्या व दुसऱ्या अशा दोनही लाटांत आतापर्यंत ११५ बाधितांचे मृत्यू जळगाव ग्रामीणमध्ये नोंदविण्यात आले आहेत. तर, ४९ गावांमध्ये सध्या सक्रिय रुग्ण आहेत.

जळगाव तालुक्यात शहरातच सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. ग्रामीण भागात त्या तुलनेत कमी रुग्ण आहेत. मात्र, संसर्ग हळूहळू वाढतच आहे. ग्रामीण भागात नशिराबाद, म्हसावद, कानळदा, भादली, धामणगाव या आरोग्य केंद्रांमार्फत गावांमध्ये तपासणी केली जाते. यात आरोग्य केंद्रनिहाय तपासणी करण्यात येत असून तपासण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. नियमित बाधित होणाऱ्यांच्या संख्येत काहीशी वाढ झाली आहे. डिसेंबर ते जानेवारीदरम्यान तालुक्यात केवळ ४ ते ५ सक्रिय रुग्ण होते. मात्र, दुसऱ्या लाटेत सर्वत्रच संसर्गाचे प्रमाण वाढून जळगाव ग्रामीणमध्येही आता सक्रिय रुग्णांची संख्या २८८ वर पोहोचली आहे.

जळगावात ग्रामीण एकूण रुग्ण : ३६४१

जळगाव शहर : २८८६०

सर्वाधिक रुग्णसंख्या असलेले गाव : सावखेडे- ३८७

कोरोनाबाधित गावे : ७८

कोरोनामुक्त गावे : २९

सर्वाधिक मृत्यू असलेली पाच गावे

नशिराबाद १७

आसोदा १४

भादली ८

आव्हाने ७

ममुराबाद ६

सर्वाधिक रुग्ण असलेली पाच गावे

सावखेडे ३८७

नशिराबाद ३८१

शिरसोली प्र.न. २४६

आसोदा २२१

शिरसोली प्र.बो. २१२

सर्वाधिक सक्रिय रुग्ण असलेली पाच गावे

शिरसोली प्र.न. ३१

कुसुंबा २४

भादली २३

चिंचोली १७

शिरसोली प्र.बो १६

जळगावात उपचाराची व्यवस्था

तालुक्यातील गावांमधील सर्व रुग्णांची व्यवस्था ही जळगाव शहरातील विविध रुग्णालयांतच करण्यात आली आहे. ज्या गावांत अधिक रुग्ण किंवा मृत्यू आहेत, ती गावे जळगावपासून १० ते १५ किमीच्या आत आहेत. सौम्य लक्षणे असलेल्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येत असते. यानंतर इकरा महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांना दाखल करण्यात येत आहे. यात लक्षणांनुसार रुग्णांना दाखल करण्यात येते.

व्हेंटिलेटरची स्थिती बिकटच

जळगाव शहरात खासगी व शासकीय यंत्रणेत आता ऑक्सिजन बेड माेठ्या प्रमाणात तयार करण्यात आले आहेत. मात्र, रुग्णसंख्या प्रचंड वाढल्याने काहीच रुग्णालयांत ऑक्सिजन बेड खाली असल्याचे चित्र आहे. मात्र, व्हेंटिलेटर हे खालीच नसल्याचे गंभीर चित्र जळगाव शहरात आहे. सद्य:स्थितीत आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही आपत्कालीन कक्षात जागा नसून परिस्थिती पुन्हा बिकट झाली आहे. पाच बेडवर १० रुग्ण अशी परिस्थिती आहे. दुसरीकडे मोहाडी रुग्णालयातही ऑक्सिजनचे बेड फुल्ल झाले आहे.

आरोग्य केंद्रांनुसार तपासण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. नागरिकांनी लक्षणे जाणवल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी, आजार अंगावर काढू नये. त्यामुळे रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. लवकर निदान झाल्यास रुग्ण लवकर बरा होताे. तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत. - डॉ. संजय चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी

Web Title: 115 victims die in rural Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.