मुक्ताईनगरात ११९६ अँटीजन तपासण्या, २१० पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 03:23 PM2020-08-17T15:23:36+5:302020-08-17T15:25:12+5:30
उपजिल्हा रुग्णालयात महिनाभरापासून, तर नुकतेच तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनासाठी कोविड-१९ अँटीजन तपासणी केली जात आहे.
मतीन शेख
मुक्ताईनगर, जि.जळगाव : येथील उपजिल्हा रुग्णालयात महिनाभरापासून, तर नुकतेच तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनासाठी कोविड-१९ अँटीजन तपासणी केली जात आहे. अँटीजन तपासणी निष्कर्षात एकूण रुग्णांच्या अहवालात ९४.५ टक्के अहवाल निगेटिव्ह तर साडेपाच टक्के रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत १२ रूग्णांच्या मागणीवरून कोविड-१९ चा अहवाल देण्यात आला असून, हे मागणी झालेले सर्व अहवाल निगेटिव्ह होते.
अहवालाच्या समांतर रुग्ण लक्षणं
कोरोना संसर्गजन्य आजार ग्रामीण भागात पाय पसरवत आहे. उपाययोजना म्हणून जिल्ह्याच्या ठिकाणावर होणाऱ्या आरटीपीसीआर तपासणी पाठोपाठ आता तालुका स्तरावर कोरोनासाठी कोविड-१९ अँटीजन तपासणी सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरटीपीसीआर तपासणीच्या तुलनेत कोविड-१९ अँटीजन तपासणीबाबत अनेक शंका कुशंका असल्या तरी या तपासणी अहवालाच्या समांतर रुग्ण लक्षणं यांची ताळमेळ बसत असल्याने तालुकास्तरावर कोरोना रुग्णांवर वेळीच उपचार होत आहेत. परिणामी जिल्हा स्तरावरील कोविड रुग्णालयाचा भार कमी होऊन तालुका स्तरावर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांवर उपचार होत आहे आणि उपचार होऊन रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत आहे.
११९६ तपासण्या, २१० पॉझिटिव्ह
येथील उपजिल्हा रुग्णालयात १३ जुलैपासून कोविड-१९ साठी अँटीजन तपासणी सुरू झाली आहे. १७ आॅगस्टपर्यंत १ हजार १५१ रुग्णांची कोविड-१९ तपासणी करण्यात आली. यात ९४६ रुग्ण निगेटिव्ह तर २०५ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर तालुक्यातील रुईखेडा, अंतुर्ली, उचंदे व कुºहा प्राथमिक आरोग्य केंद्रातदेखील गेल्या पाच दिवसांपासून अँटीजन टेस्ट करण्यास सुरुवात झाली. ४५ तपासण्या झाल्या आहेत यात ५ रुग्ण कोविड-१९ पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यात १ हजार १९६ तपासण्या झाल्या. यात २१० अँटीजन टेस्ट पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह येण्याचा टक्का हा ५.६ इतका आह.े
मागणी केल्यास दिला जातो अहवाल
महानगर व जिल्ह्याच्या ठिकाणावर कोविड-१९ च्या अँटीजन तपासणी अहवालाबाबत गेल्या काळात गदारोळ उडाला होता. अँटीजन व आरटीपीसीआर तपासणी अहवालात तफावत असल्याची आरोड झाली होती. त्या अनुषंगाने ग्रामीण भागात उपजिल्हा रुग्णालयात कोविड-१९ तपासणी केल्यानंतर पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे अहवाल देण्याबाबत कोणत्याही मार्गदर्शक सूचना नाहीत. परिणामी निगेटिव्ह आलेल्यांपैकी कोणी अहवाल मागितल्यास उपजिल्हा रुग्णालयातून तो दिला जात आहे. आतापर्यंत १२ जणांना हा अहवाल देण्यात आला आहे.
कोविड-१९ अँटीजन टेस्ट सुरू होऊन महिना झाला आहे. आतापर्यंत अहवालात तफावत दिसून आलेली नाही.पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे अहवाल देण्याबाबत कोणत्याही मार्गदर्शक सूचना नाहीत. आतापर्यंत १२ जणांना मागणीवरून अहवाल देण्यात आले आहेत. ते सर्व निगेटिव्ह होते.
-डॉ.योगेश राणे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर