अवघ्या १२ दिवसाच्या बाळाने जिंकली कोरोची लढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 12:55 PM2020-08-11T12:55:33+5:302020-08-11T12:55:48+5:30
जन्मताच होते बाधित : गंभीर स्थितीतून बाहेर काढण्यास यश
जळगाव : जन्मताच कोविड बाधित असलेल्या जळगावातील पहिल्या बाळाला कोरोनामुक्त करण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले़ या बाळाला निगेटीव्ह आल्यानंतर सोमवारी दुपारी त्याच्या घरी सोडण्यात आले़ आई निगेटीव्ह असली तरी घरी असल्याने आत्याने या चिमुकल्याला घरी नेले़ यावेळी अनेकांचे डोळे पाणावले होते़
आई बाधित असल्याने बाळाला लागण होणे हे अत्यंत दूर्मिळ असून जळगावातील हे पहिलेच बाधित नवजात बाळ आहे़ शिवाय बाळाला सुरूवातीपासून श्वास घ्यायला त्रास होणे, साखरेचे प्रमाण जास्त, पचनशक्तीकमी, अशा गंभीरावस्थेत हे बाळ होते़ मात्र, पहिल्या दिवसांपासून कोविड रुग्णालयातील डॉक्टर्सनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली़ अधिष्ठाता डॉ़ जयप्रकाश रामानंद व वैद्यकीय अधीक्षक डॉ़ दत्तात्रय बिराजदार हे या बाळावर लक्ष ठेवून होते़ डॉ़ बाळासाहेब सुरवसे व टीमने शर्थीचे प्रयत्न केले व योग्य औषधोपचाराने बाळाला कोरोनातून बाहेर काढले़ चौथ्या दिवसांपासून बाळाला दूध पचायला लागले व आमचा जीव भांड्यात पडला़ असे अधिष्ठाता डॉ़ जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले़ त्यानंतर बाळाच्या प्रकृतीत सुधारणा झाली व ९ रोजी या बाळाचे पुन्हा स्बॅब घेण्यात आले व बाळ निगेटीव्ह आले.
१०७ वर्षांची आजी झाली बरी
शहरातील एका १०७ वर्षाच्या वृद्ध महिलेला कोरोनाची लागण झाली होती़ या महिलेला रुग्णालयात आणण्यासाठी रुग्णवाहिका पाठविण्यात आली़ महिलेला दाखल करण्यात आले़ सर्व उपचारानंतर या महिलेला सोमवारी सायंकाळी घरी सोडण्यात आले़
पहाटे दीड वाजता सिझर
कोरोना संशयित गर्भवती महिलेचे ३० रोजी पहाटे दीड वाजता सिझरेरीयन करण्यात आले होते़ महिलेने गोंडस मुलाला जन्म दिला़ मात्र, आईचे अहवाल बाधित आल्यानंतर तातडीने बाळाची तपासणी करण्यात आली व त्याचेही अहवाल बाधित आल्यानंतर खळबळ उडाली होती़ बाळाला नवजात शिशूकक्षातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले व या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू झाले़ आई एक दिवस आधीच कोरोनामुक्त होऊन घरी गेलेली आहे़ जन्मापासून दहा दिवस आईपासून दूर असलेले बाळ आईच्या कुशीत समावणार आहे़
गंभीरावस्थेत असलेल्या नवजात शिशूला डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनी कोरोनामुक्त होऊन घरी पाठविले़ आईपासून बाळ बाधित होणे ही दूर्मिळ घटना़ मात्र, आम्ही हादरलो होतो आज या बाळाला घरी सोडले़ यासह एका १०७ वर्षाच्या आजींही बऱ्या होऊन कोविड रुग्णालयातून घरी परतल्या़
- डॉ़ जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता,