वाकडी प्रकरण : तक्रार मागे घेण्यासाठी १२ तास ठेवले ओलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:37 PM2018-06-23T12:37:07+5:302018-06-23T12:40:34+5:30

जामनेर व जळगाव येथे आणले न्यायालयात

For 12 Hours To Cancel Complaint | वाकडी प्रकरण : तक्रार मागे घेण्यासाठी १२ तास ठेवले ओलीस

वाकडी प्रकरण : तक्रार मागे घेण्यासाठी १२ तास ठेवले ओलीस

Next
ठळक मुद्देगाव पुढाऱ्यांनी आणला दबावचारचाकीत बसविले अन् जामनेरात आणले

विकास पाटील
जळगाव : विहिरीत पोहले म्हणून आमच्या दोन मुलांना बेदम मारहाण केली, नागडे करुन त्यांची धिंड काढली. विनवण्या करुनही त्यांची सुटका केली नाही, याबाबत पोलिसात दिलेली तक्रार मागे घ्यावी यासाठी आमच्यावर प्रचंड दबाव आणला. आम्हाला १२ तास ओलीस ठेवले, अशी धक्कादायक माहिती पीडित मुलांच्या कुटुंबीयांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
जामनेर तालुक्यातील वाकडी येथील ईश्वर बळवंत जोशी यांच्या शेतात मातंग समाजाचे मुले पोहले म्हणून त्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली व त्यांची धिंड काढल्याची घटना १० जून रोजी घडली. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार करुनही त्यांनी १३ रोजी गुन्हा दाखल केला. पोलिसात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी काही गाव पुढाºयांनी पीडित मुलांवर व त्यांच्या कुटुंबीयांवर प्रचंड दबाव आणला. १४ रोजी तब्बल १२ तास या कुटुंबीयांना ओलीस ठेवण्यात आल्याची थरारक माहिती या कुटुंबीयांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीला दिली.
तक्रार मागे घेण्यासाठी खूप दबाव
कुटुंबीय म्हणाले, आमच्या दोन मुलांना अमानुषपणे मारहाण केल्याची घटना आम्हाला आधी मुलांनी सांगितली नाही. या घटनेचा गावात व्हिडिओ व्हायरल झाला. तो काही लोकांनी आम्हाला दाखविला. त्यात आपली मुले खूप मारखात असल्याचे आम्हाला दिसले. त्याबाबत मुलांना विचारले असता त्यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्याबाबत तक्रार देण्यासाठी आम्ही पहूर पोलीस स्टेशनला गेलो. तेथे तक्रार दिली. मात्र तुम्ही फत्तेपूरला जा असे पोलिसांनी सांगितले...आम्ही फत्तेपूरला गेलो. तेथून पुन्हा पहूरला पाठविले. तक्रार करण्याच्या आधी विचार करा, असे आम्हाला बजावले. आम्ही तक्रार देण्यावर ठाम होतो. तक्रार देवून आम्ही घरी आलो. ती मागे घेण्यासाठी काही मंडळींनी आमच्यावर खूप दबाव आणला.
चारचाकीत बसविले अन् जामनेरात आणले
आम्ही तक्रार मागे घेत नसल्याने काही मंडळी गुरुवार, १४ रोजी सकाळीच आमच्या घरी आले. त्यांनी आमच्या सोबत चला म्हणून आग्रह केला. एका मोठ्या चार चाकीत आम्हाला (पीडित मुले व दोन्ही कुटुंबांना) बसविले. जामनेर येथे आणले. तेथे न्यायालयापुढे हे प्रकरण आणून मिटवून टाकू असे आम्हाला सांगितले.
त्यासाठी न्यायालय आवारात आणले. वकीलांनी आमची समजूत घातली. आमच्या हातांचे ठसेही घेतले. त्यानंतर मोठ्या कोर्टात (जळगावात आणले) जळगावात आणल्यानंतर न्यायालयाच्या आवारात आम्हाला नेण्यात आले. तेथे काही वकील आले. त्यांनीही आमची समजूत घातली. ईश्वर जोशी यांच्या शेतातून चोरी केली म्हणून आपल्यावरही गुन्हा दाखल होईल म्हणून व गाव पुढाºयांनी आपल्यावर प्रचंड दबाव आणल्याने आणि आपल्याला यापुढे गावातच राहावयाचे असल्याने तक्रार मागे घेण्यास तयार झालो. त्यासाठी काही कागदांवर ठसेही घेण्यात आले. त्यानंतर आम्हाला पुन्हा जामनेरला आणण्यात आले.
रात्र झाल्याने गुरुवारी एका खोलीत आम्ही मुक्काम केला. शुक्रवार, १५ रोजी वाकडी गावात आम्हाला सोडण्यात आले, असे कुटुंबीयांनी ‘लोकमत’ला सांगितले.
चोरीचा गुन्हा दाखल करण्याची जोशीची धमकी
ईश्वर जोशीने तर शेतातील पाच पानबुड्या व ठिबकच्या नळ्यांचे बंडल तुम्ही चोरी केल्या अशी तक्रार तुमच्याविरुद्ध देण्यात येईल, अशी धमकी दिली होती. तर काही लोक आमच्या घरी आले व तक्रार मागे घेण्याची विनंती करु लागले. जे झाले ते विसरुन जा. तुम्हाला काय हवे ते आम्हाला सांगा तुम्हाला ते देवू असे म्हणू लागले. मात्र आम्ही ऐकले नाही. तक्रारीवर ठाम होतो.
वाकडी प्रकरणातील चौघे कारागृहात
जामनेर तालुक्यातील वाकडी येथे विहिरीत पोहण्यासाठी गेले म्हणून दोन मुलांना नग्न करून मारहाण केल्या प्रकरणातील संशयित आरोपी ईश्वर बळवंत जोशी, प्रल्हाद कैलास लोहार, अजिज कासम तडवी, शकनुर सरदार तडवी (सर्व रा़ वाकडी़ ता़ जामनेर) यांना जळगावात न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.
क्रमश:

Web Title: For 12 Hours To Cancel Complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.