१२ मतीवाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 12:48 AM2018-07-09T00:48:37+5:302018-07-09T00:48:57+5:30
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘हसु भाषिते’ या सदरात लिहिताहेत साहित्यिक प्रा.अनिल सोनार
नको तेव्हा दत्त म्हणून समोर उभा राहणार नाही तो नाना कसला आणि नको तेव्हा, नको ते प्रश्न विचारणार नाही, तो तर नाना असूच शकत नाही. समोरच्याच खुर्चीत बसकण मारत नानाने विचारलं.’ अहो विद्वान, मुत्सद्दी म्हणजे काय? आणि आमच्यात प्रश्नोत्तरं झालीत ती पुढीलप्रमाणे-
‘मला काय माहीत?’
‘तू विद्वान आहेस ना.’
‘नाही मी विनोदी लेखक आहे.’
‘अरे पण विचारवंत तरी आहे की नाही?’
विनोदी लेखक कधी विचारवंत असतो का?’
‘अरे, पण तू चिंतन, मनन करत, असशीलच की.’
‘नाही, मी फक्त विनोद करतो.’
‘पण अंतर्मुख होऊन विचार तर करत असशील ना?’
‘अंतर्मुख? ते काय असतं?’
‘अरे, हास्य खर्डेघाषा. तुला काय म्हणायचं आहे की हसणारी, हसवणारी माणसं वरवरच्या गोष्टी बघणारी, थिल्लर, उथळ असतात? तात्त्विक विचार करण्याची त्यांच्या बुद्धीत ताकदच नसते?’
‘वकूबच नसतो रे तेवढा आमच्या सारख्यांचा’
‘म्हणजे विनोदी लेखक विद्वान, विचारी असूच शकत नाही?’
‘कसं बोलतोस. मला अगदी आरशात स्वत:चा चेहरा बघितल्यासारखं वाटलं बघ.’
‘मुर्खा, आचार्य अत्रे, पु.ल.देशपांडे यांचं काय?’
‘नाना, तू त्यांना विचारलेलं नाहीस रे, की मुत्सद्दी म्हणजे काय? मला विचारलं आहेस.’
‘त्यांना विचारायला जायची गरज नाही. अत्रे साहेबांनी लिहूनच ठेवलंय की ज्यांच्या अंत:करणातून मानव जातीबद्दलचा सहानुभूतीचा झरा एकसारखा वाहतो आहे, आणि सर्व मानवजात सुखी आणि आनंदी व्हावी, अशी ज्याच्या अंत:करणाला तळमळ लागून राहिली आहे, अशा उमद्या आणि दिलदार माणसालाच आयुष्यात विनोदाचा साक्षात्कार होतो. हलकट आणि लबाड माणसे काही विनोदी होऊ शकत नाहीत.’
‘नाना, कादर खान, शक्ती कपूर प्रभावळीला विसरू नकोस.’
‘मूर्खा, मी ओंगळ, बटबटीत, बिभत्सपणाबद्दल बोलत नाहीये. निकोप, सुसंस्कृत, हृद्य विनोदाबद्दल बोलतोय. गांभिर्याचे किंवा विद्वत्तेचे, जसे खोटे सोंग आणता येते, तसे विनोदाचे कृत्रिम अवसान, आणता येत नाही. कळलं? म्हणून मी तुला विचारी विद्वान वगैरे समजून विचारलं की मुत्सद्दी म्हणजे काय?’
‘समजा, मी तुला उत्तर दिलं आणि तुझी अस्मिता दुखावली गेली, आणि तू बाह्या सावरत माझ्या अंगावर धाऊन आलास तर?’
‘नाही येणार. बोल’
‘नाना, मित्रा, तू नुसता भोट राहिलास. इतका वेळ मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर न देता, तुला खेळवत राहिलो ना, यालाच मुत्सद्देगिरी म्हणतात... म्हणशील तर मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंही आहे, आणि म्हणशील तर थेट उत्तर देणं खुबीनं टाळलंही आहे. आपल्या महाराष्ट्रात एक आदरणीय व्यक्ती आहे तिच्या जीवनचरित्राचा अभ्यास कर, म्हणजे मुत्सद्दी म्हणजे काय ते तुला आपोआप कळेल. तुलाही मुत्सद्दी होता येईल. मात्र त्यासाठी नेहमीपेक्षा बारा पट जास्त बुद्धी आपल्याजवळ असायला हवी. त्यांच्यावरची माझी रचना ऐक-
कधी पासंगासही ना पुरे हा १२ मतीवाला,
कधी गोदामे भरून उरे हा १२ मतीवाला.
टीकेची झोड हा साही, तरीही मौना ना सोडी,
खरा तरबेज मुत्सद्दी ठरे हा १२ मतीवाला.
कलेच्या अंतरंगी शिरुनी लीलया साक्षेपी बोले
विस्मित मर्मज्ञा बघूनी हसे हा १२ मतीवाला.
कुणा वाटे क्रिकेटचा, कुणा वाटे नाटकवाला
कृषीतज्ञांस शेतीतच दिसे हा १२ मतीवाला.
बोलला एक, दुजे करतो. नसोनी सर्वत्रच असतो.
सर्वांना दशांगुळे पुरुनी उरे हा १२ मतीवाला.
-प्रा.अनिल सोनार, धुळे