चाळीसगाव तालुक्यात बिबटय़ाच्या हल्ल्यात 12 वर्षीय मुलगा ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 05:50 PM2017-11-12T17:50:50+5:302017-11-12T17:51:03+5:30
देशमुख वाडीतील घटना : दोन मेंढय़ांच्या पिलांचाही बळी
लोकमत न्यूज नेटवर्क पिलखोड/टाकळी प्र.दे., ता.चाळीसगाव : बिबटय़ाच्या हल्ल्यात 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना देशमुखवाडी शिवारात शनिवारी मध्यरात्री घडली. काळू देवाजी सोनवणे असे या मुलाचे नाव आहे. देशमुखवाडी शिवारातील अजरुन सुपडू पाटील यांच्या शेतात 11 रोजी जामदरी येथील देवा वेडू होडगर (धनगर) यांचा मेंढय़ांचा कळप दाखल झाला होता. त्यांच्यासोबत वेहळगाव, ता.नांदगाव येथील काळू देवाजी सोनवणे (वय 12) हा मुलगा मेढय़ांच्या देखरेखीसाठी होता. याच शेतात काळू सोनवणे हा झोपलेला होता. त्या ठिकाणी बिबटय़ाने या झोपलेल्या मुलावर हल्ला केला व गळा धरून 150 फूट अंतरावर फरफटत नेले. त्यात त्याचा मृत्यू झाला. या मुलास ठार मारण्यापूर्वी धनगर कुटुंबियांच्या लहान मुलीवरदेखील बिबटय़ाने झडप घातली होती. त्या मुलीने गोधडी पांघरली होती. त्यामुळे त्या मुलीला सोडून या मुलावर बिबटय़ाने हल्ला केला. याशिवाय बिबटय़ाने दोन मेंढय़ांच्या पिलांनादेखील ठार केले. घटनास्थळी वनरक्षक प्रकाश पाटील व सहका:यांनी भेट दिली व पंचनामा केला. उंबरखेड येथील महिला काठेवाडी मुलगा व आजही ही तिसरी घटना तसेच वासरे ठार बिबटय़ा करीत असल्याने या भागात पुन्हा घबराटीचे वातावरण पसरले आहे. काळू सोनवणेची कौटुंबिक पाश्र्वभूमी हलाखीची असून, आई-वडील ऊसतोडणीसाठी औरंगाबाद जिल्ह्यात गेले आहेत. बाळूला दोन भाऊ आहेत. या हल्ल्यामुळे पुन्हा शेत शिवारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रभर वनविभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. सकाळी मृतदेह शव विच्छेदनासाठी चाळीसगाव येथील सरकारी दवाखान्यात पाठविण्यात आला. दुपारी त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.