जळगाव जिल्ह्यात १२०० कोटी रुपयांची गुंतवणूक येणार!
By अमित महाबळ | Published: March 7, 2024 08:21 PM2024-03-07T20:21:05+5:302024-03-07T20:22:02+5:30
या गुंतवणुकीमुळे साडेतीन हजारपेक्षा अधिक रोजगार निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अमित महाबळ, जळगाव : जिल्ह्यातील उद्योजकांसाठी आणि उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी गुरुवारी (दि.७) जळगावमध्ये आयोजित गुंतवणूक परिषदेचे फलित म्हणून २६ उद्योगांत १२०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले आहेत, अशी माहिती खासदार उन्मेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या गुंतवणुकीमुळे साडेतीन हजारपेक्षा अधिक रोजगार निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उन्मेश पाटील यांनी सांगितले की, गुंतवणुकीच्या सामंजस्य करारांमुळे जळगाव जिल्ह्यातील रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. कृषी उत्पादन प्रक्रिया, केमिकल, इंजिनिअरिंग, केळी व मका प्रक्रिया उद्योग, वस्त्रोद्योग यामध्ये गुंतवणूक होणार आहे. यातून ३६२३ थेट रोजगारांची निर्मिती होईल. १२०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीपैकी ५०० कोटी रुपये हे स्थानिक भूमिपुत्र गुंतवणार आहेत. रोजगार निर्मितीसाठी उद्योग आले पाहिजेत, त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत हवे. महामार्ग, रेल्वेसह हवाई कनेक्टिव्हिटी मोठ्या शहरांशी जोडली जात आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचे सहकार्य लाभत आहे. पाचोरा, जामनेर, बोदवड हा रेल्वेमार्ग गूड्स कॅरिअर म्हणून विकसित होत असून, या मार्गाच्या पट्ट्यात इंडस्ट्रीयल हब असणार आहे. नवीन उद्योग जळगावमध्ये येण्यास इच्छूक आहेत पण मोठी जागा उपलब्ध नाही. त्यावर उपाय म्हणून एरंडोल तालुक्यात जागा शोधण्यास प्रशासनाला सांगण्यात आले आहे.
९ हजार कोटी कर्ज मिळू शकते...
बँकांतील ठेवी व कर्जाचे प्रमाण लक्षात घेता आणखी ९ हजार कोटी रुपये कर्ज बँका देऊ शकतात. विदर्भ व मराठवाड्यातील उद्योगांना सबसिडीमुळे कमी दरात वीज मिळते. या योजनेत खान्देशचाही समावेश होणार आहे. लिंबू व केळी प्रक्रिया, डाळ, प्लास्टिक, कापूस उद्योग यांच्यावर अधिक लक्ष दिले जाणार आहे. पुढील वर्षात आणखी गुंतवणूक येणार असून, तरुणांना वेंडर होण्याची संधी आहे, असेही खासदार उन्मेश पाटील यांनी सांगितले.
बनाना वाइन यार्ड
केळी महामंडळाची घोषणा झाली असून, त्याला निधी मिळवून देण्यास प्राधान्य आहे. केळीला मनरेगा कवच मिळवून देण्यात आले आहे. त्याचा शेतकऱ्यांना लाभ होत आहे. केळीसंदर्भात बनाना वाइन यार्ड, बेबी फूड प्रकल्प यावरही विचार सुरू आहे. उद्योगांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आठ लाख कामगारांसाठी रुग्णालय उभारले जाणार आहे. वीजपुरवठ्यासाठी जळगाव शहरात चार वीज उपकेंद्रे मंजूर करून घेतली आहेत. शेळगाव बॅरेजमुळे उद्योगांना पाणी मिळेल. सामूहिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा प्रस्ताव मंजुरीसाठी सरकारकडे पाठवला आहे, अशी माहिती उन्मेश पाटील यांनी दिली.
नाइट लँडिंगसाठी ५५ कोटी
जळगावहून सुरू झालेली विमानसेवा बंद पडली होती. आधीच्या कंपनीचे अनुभव लक्षात घेता जळगाव विमानतळावर नाइट लँडिंगच्या सुविधेसाठी ५५ कोटी रुपये निधी मंजूर करून आणल्याचे खासदार उन्मेश पाटील म्हणाले.