कोव्हॅक्सिनचे आज सायंकाळपर्यंत १,२०० डोस येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:18 AM2021-05-26T04:18:00+5:302021-05-26T04:18:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन कुठलीच लस न आल्याने, महापालिकेच्या सर्व केंद्रांसह रोटरी भवन व रेडक्रॉस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन कुठलीच लस न आल्याने, महापालिकेच्या सर्व केंद्रांसह रोटरी भवन व रेडक्रॉस अशी सर्व केंद्रे सलग दुसऱ्या दिवशी बंद राहणार आहेत. दरम्यान, बुधवारी सायंकाळपर्यंत कोव्हॅक्सिनचे १,२०० तर काेविशिल्डचे २० हजार ४०० डोस येणार असून, गुरुवारी ते केंद्रांवर उपलब्ध होणार आहेत. मंगळवारीही लस नसल्याने शहरातील केंद्र बंद होते.
कोविशिल्डच्या तुलनेत कोव्हॅक्सिनचा शासकीय यंत्रणेत अत्यंत कमी पुरवठा होत आहे. त्यामुळे अनेकांचा दुसरा डोस लांबला आहे. त्यातच आता येणारे डोसही अत्यल्प असून, यातून केवळ दुसऱ्या डोसचे नियोजन करण्यात आले आहे. मंगळवारी जिल्हाभरात १,४६२ जणांनी कोविशिल्डचा पहिला डोस घेतला, तर केवळ २५ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. बुधवारीही सर्व केंद्रे बंद राहणार आहेत, अशी माहिती प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलानी यांनी दिली. खासगीतील एका केंद्रावर लसीकरण सुरू करण्यात आले आहे. ते केंद्र मात्र, मंगळवारी सुरू होते. शहरात लसीकरणाची आठ केंद्रे आहेत. मात्र, लसीचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने, यापैकी केवळ तीनच केंद्रांवर गेल्या काही दिवसांपासून लसीकरण सुरू आहे. केवळ एका दिवसाचाच साठा उपलब्ध होत असल्याने लसीकरण मोहीम थंडावली आहे.
पहिला डोस घेणारेच अधिक
कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिनच्या येणाऱ्या सर्व डोसमध्ये दुसरा डोस बाकी असणाऱ्या नागरिकांना प्राधान्य आहे. मात्र, सद्यस्थिती जिल्ह्यात या साठ्यात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्याच अधिक असल्याचे चित्र आहे. मंगळवारीही तशीच स्थितीत होती. यात केवळ भडगाव, जामनेर, पाचोरा, पारोळा, रोवर आणि एका प्राथमिक आरोग्य केंद्रांवर २ तर उपकेंद्रांवर ३ अशा केवळ २५ जणांनी दिवसभरात दुसरा डोस घेतला, तर त्या तुलनेत १,४६२ लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढविण्यात आल्याने दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या घटली आहे. मात्र, ४५ वर्षांवरील नागरिकांची आताही पहिला डोस घेण्यासाठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे.
१८ वर्षांवरील लाभार्थी प्रतीक्षेतच
शासकीय यंत्रणेत १८ ते ४४ वयोगटांचे लसीकरण लसींचा पुरवठा कमी असल्याने थांबविण्यात आले असून, अद्यापही ते सुरू झाले नसल्याने या वयोगटांचे लसीकरण नेमके कधी सुरू होणार, हे सांगणे आरोग्य यंत्रणेलाही कठीण झाले आहे. कोविशिल्ड लसीचे दुसऱ्या डोसचे अंतर वाढविण्यात आल्याने, दुसऱ्या डोसचा तेवढा लोड राहिलेला नसल्याने, या वयोगटांसाठी लवकर लसीकरण सुरू करावे, अशी मागणी जोर धरत आहे. खासगीत या वयोगटांसाठी लसीकरण आहे. मात्र, ते सशुल्क आहे. त्यामुळे या लसीकरणावर मर्यादा असल्याचे चित्र असून, शासकीय यंत्रणेतील लसीकरणाकडेच नागरिकांचे लक्ष लागून आहे. त्याच आता या वयोगटांसाठी नोंदणी करणे आवश्यक असले, तरी केंद्र मिळाले, तरच लस हा पर्याय नसल्याने लस घेणे सोयीचे होणार आहे. मध्यंतरी अगदी काही सेकंदात स्लॉट बुक होत असल्याने, या वयोगटांतील लाभार्थ्यांचा मोठा गोंधळ उडाला होता. ही अशी पद्धत बंद करण्याची मागणी त्यावेळी समोर आली होती. ही अत्यंत किचकट प्रक्रिया असून, लसीकरणाला सोपी पद्धत असावी, अशी मागणी त्यावेळी तरुणांकडून समोर आली होती.
बुधवारी असा आहे कोविशिल्डचा साठा
पाल ग्रामीण रुग्णालय : १०
पहूर ग्रामीण रुग्णालय : ३०
सावदा ग्रामीण रुग्णालय : ५०
वरणगा ऑडन्स ॲक्टरी : ३०
वाघळी आरोग्य केंद्र : २०
रिंगणगाव आरोग्य केंद्र : १०
बेटावद आरोग्य केंद्र : १०
अंतुर्ली आरोग्य केंद्र : १०
विश्वप्रभा हॉस्पिटल : ४ हजार कोव्हॅक्सिन