बँकेचा खातेक्रमांक नसल्यामुळे जिल्ह्यातील १२ हजार 'मोलकरणी` आर्थिक लाभापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:12 AM2021-07-01T04:12:47+5:302021-07-01T04:12:47+5:30
जळगाव : राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित करतांना घरेलू काम करणाऱ्या मोलकरणींना दीड हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची ...
जळगाव : राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित करतांना घरेलू काम करणाऱ्या मोलकरणींना दीड हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार कामगार आयुक्त कार्यालयातर्फे नोंदणी झालेल्या महिलांना ही मदत देण्यात येत आहे. मात्र, नोंदणी झालेल्या १४ हजारपैकी फक्त २ हजारच महिलांनी बॅंकेचे खाते क्रमांक दिले असल्याने या महिलांना दीड हजारांची मदत देण्यात आली असून, उर्वरित १२ हजार मोलकरणी मात्र या लाभापासून वंचित राहिल्या आहेत.
यंदा मार्चपासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर शासनाने १५ एप्रिलपासून सुरुवातीला संचारबदी व नंतर ३० मेपर्यंत कडक लॉकडाऊन लागू केला होता. हा लॉकडाऊन जाहीर करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेरीवाले, रिक्षावाले या प्रमाणे घरेलू काम करणाऱ्या मोलकरणींनाही दीड हजार रुपये अर्थ सहाय्य देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार ही आर्थिक मदत देण्यासाठी जिल्हा कामगार कार्यालयाकडे ७० लाखांचा निधी जमा करण्यात आला आहे. मात्र, जिल्हा कामगार कार्यालयाकडे नोंदणी झालेल्या १४ हजार मोलकरणींपैकी फक्त १ हजार ८२२ महिलांनी आपल्या बँकेच्या खात्याचा तपशील दिला आहे. तर उर्वरित महिलांनी फक्त नोंदणीच केली आहे. ज्या महिलांनी बँकेचा खाते क्रमांक दिला होता, त्या सर्व महिलांच्या खात्यात दीड हजार रुपयांची आर्थिक मदत जमा करण्यात आली असल्याचे कामगार कार्यालयातर्फे सांगण्यात आले. तर बँक खाते क्रमांक नसलेल्या महिलांना अजून कुठलीही आर्थिक मदत देण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
दीड हजारप्रमाणे २७ लाखांची वाटप
कामगार कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे आतापर्यंत जिल्ह्यातील नोंदणीकृत महिलांची संख्या १४ हजार आहे. त्यापैकी १ हजार ८२२ महिलांनी नोंदणी केल्यानंतर बँक खात्याचा तपशील कामगार कार्यालयाकडे दिला आहे. तर उर्वरित महिलांनी दिलेला नाही. त्यामुळे शासनाच्या सूचनेनुसार या १ हजार ८२२ मोलकरीणींना दीड हजार रुपयेप्रमाणे आतापर्यंत २७ लाख ३३ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. तसेच ज्या मोलकरणींकडे कामगार कार्यालयाकडे
नोंदणी केल्याचे नोंदणीपत्र किंवा इतर पावती असेल, त्यांनी तत्काळ जळगाव येथील बी.जे. मार्केट कार्यालयात बँकेचा खाते क्रमांक नोंदवून लाभ घेण्याचे आवाहन कामगार कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
इन्फो :
शासनाच्या सूचनेनुसार कामगार कार्यालयाकडे नोंदणी असलेल्या महिलांनाच ही मदत देण्यात येत असून, ज्या मोलकरणींनी आमच्याकडे बँकेच खातेक्रमांक दिला होता, त्या सर्वांना ही मदत देण्यात आली आहे. तसेच ज्या महिलांकडे कामगार कार्यालयात नोंदणीचे पत्र किंवा इतर पावती असेल, त्यांनी ते कागदपत्र आणि बँकेचा खातेक्रमांक आणून कामगार कायार्लयात जमा करावा, त्यांना मदत दिली जाईल.
चंद्रशेखर बिरार, सहायक कामगार आयुक्त, जळगाव
इन्फो :
तर ‘त्या’ महिलांना रोख रक्कम देण्याची मागणी
कामगार आयुक्त कार्यालयातर्फे नोंदणीकृत आणि ज्या मोलकरणी महिलांनी बँकेचा खातेक्रमांक दिला आहे. त्या महिलानांच दीड हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येत आहे. मात्र,सध्या स्थितीला हातावर पोट भरणाऱ्या अनेक घर कामगार महिलांचे बँकेत खाते नाही. त्यामुळे कामगार कार्यालयाने उर्वरित महिला या आर्थिक लाभापासून वंचित राहू नये, यासाठी तालुका प्रशासनामार्फत संबंधित महिलांना थेट रोख रक्कम द्यावी, अशी मागणी जिल्हा घरकामगार मोलकरीण संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमृतराव महाजन यांनी केली आहे.