जळगावात आरटीईच्या १२२८ जागा रिक्तच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 09:19 PM2018-07-24T21:19:32+5:302018-07-24T21:20:59+5:30
आरटीईच्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या फेरीची मुदतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण निश्चित ३८१७ विद्यार्थ्यांपैकी जिल्ह्यातील २६१ शाळांमध्ये २५८९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे़ मात्र, अजुनही १२२८ जागा शाळांमध्ये रिक्तच आहेत़ त्यामुळे यंदा सर्वाधिक विद्यार्थी हे मोफत प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता आहे़
जळगाव- आरटीईच्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या फेरीची मुदतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण निश्चित ३८१७ विद्यार्थ्यांपैकी जिल्ह्यातील २६१ शाळांमध्ये २५८९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे़ मात्र, अजुनही १२२८ जागा शाळांमध्ये रिक्तच आहेत़ त्यामुळे यंदा सर्वाधिक विद्यार्थी हे मोफत प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता आहे़ एकंदरीत शाळांसह पालकांची देखील उदासीनता यातून दिसून येत आहे़ दरम्यान, रिक्त जागा भरण्यासाठी मुदत वाढ देण्यात येण्याची शक्यता आहे़
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमनुसार वंचित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अपंग विद्यार्थ्यांना खाजगी इंग्रजी, मराठी शाळेत २५ टक्के या प्रमाणात नर्सरी व इयत्ता पहिलीत मोफत प्रवेश देण्यात येत आहे़ यासाठी एकूण २६१ शाळांमध्ये ३८१७ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे़ त्यासाठी पहिली फेरी एप्रिल महिन्यात राबविण्यात आली़ यात १५२६ विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित झाले़ त्यापैकी १२१९ जणांनी प्रवेश घेतला तर ९७ विद्यार्थी अपात्र ठरले़ २१० विद्यार्थी हे प्रवेशासाठीच आले नाहीत़ त्यानंतर दुसरी फेरी घेण्यात आली़ त्यात ११५१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले होते़ त्यापैकी ७९८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला तर ५२ अपात्र ठरले़ ३०१ पाल्यांचे पालक प्रवेशासाठी आलेच नाहीत़ त्यानंतर तिसऱ्या फेरीत घेण्यात आली़ त्यात ८२७ विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित झाले़ त्यापैकी ५४१ जणांनी प्रवेश घेतला़ ४१ विद्यार्थी अपात्र तर २४६ पालका प्रवेशासाठी आलेच नसल्याची माहिती समोर आली आहे़