जळगाव शहरातील महामार्गाच्या समांतर रस्त्यांसाठी १२५ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 11:29 AM2018-03-08T11:29:11+5:302018-03-08T11:29:11+5:30
दिल्लीतील बैठकीत निर्णय
जळगाव : शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्ग क्र.६ च्या समांतर रस्त्यांसंदर्भात दिल्ली येथे केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बुधवार, ७ रोजी दुपारी बैठक झाली. त्यात समांतर रस्त्यासह शहरातील महामार्ग काँक्रीटीकरण व त्यावर तीन चौकात क्रॉसिंगसाठी भुयारी मार्ग (बोगदे) आदी कामांसाठी आधी मंजूर १०० कोटीत आणखी २५ कोटीची भर घालत १२५ कोटींचा निधी देण्यास मंजुरी देण्यात आली.
मात्र यासाठी जागेच्या मालकीचा तिढा सोडविणे आवश्यक असल्याने मनपाने महासभेत ही जागा रस्त्याच्या कामासाठी ‘नही’कडे वर्ग करून रस्त्याचे काम झाल्यावर देखभाल दुरुस्तीसाठी मनपा रस्ता ताब्यात घेईल, असा ठराव करून द्यावा लागणार असल्याची माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी ‘लोकमत’ला दिली.
आमदार खडसे व आमदार सुरेश भोळे यांनी गडकरी यांची भेट घेऊन या विषयावर तोडगा काढण्याची मागणी केल्याने ही बैठक आयोजित केली होती. त्यास खासदार ए.टी. पाटील, खासदार रक्षा खडसे , जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर तसेच ‘नही’चे अधिकारी उपस्थित होते.
शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्ग क्र.६ च्या समांतर रस्त्यांसाठी व महामार्ग दुरुस्तीसाठी १०० कोटीचा निधी हा समांतर रस्त्यांची जागा ‘नही’च्याच ताब्यात असल्याचे गृहित धरून मंजूर झाला होता. मात्र ती जागा मनपाच्या ताब्यात असल्याचे नंतर निदर्शनास आल्याने तांत्रीक अडचण निर्माण झाली. त्यामुळे हा निधी परत जाण्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यामुळे या विषयी तोडगा काढण्यासाठी आमदार खडसे यांच्या आग्रहावरून ही बैठक झाली. बैठकीत जागेच्या मुद्यावर चर्चा झाली. जागेची मालकी मनपाकडे असल्याने ‘नही’ त्यावर पैसे खर्च करू शकत नसल्याने ही तांत्रीक अडचण दूर करण्यासाठी काम करेपर्यंत मनपाने हा रस्ता महासभेत ठराव करून ‘नही’कडे वर्ग करावा. काम झाल्यावर देखभाल दुरुस्तीसाठी पुन्हा ताब्यात घ्यावा, असा तोडगा सुचविण्यात आला.
तांत्रीक अडचणीवर मनपाच्या ठरावाचा तोडगा
समांतर रस्त्यांची जागा मनपाने उच्च न्यायालयात समांतर रस्ते करण्याचे प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर ‘नही’ने मनपाकडे हस्तांतरीत केली होती. ती जागा मनपाने महासभेचा ठराव करून समांतर रस्त्यांचे काम तसेच शहरातील महामार्ग काँक्रीटीकरणाचे काम करण्यासाठी ‘नही’कडे वर्ग करण्याचा ठराव तातडीने करून देण्याचा तोडगा सुचविण्यात आला आहे. ‘नही’ने समांतर रस्त्यांचे काम केल्यानंतर ते रस्ते देखभाल दुरुस्तीसाठी पुन्हा मनपाला ताब्यात घ्यावे लागणार आहेत.
जळगाव-औरंगाबाद महामार्गाचेही चौपदरीकरण
जळगाव ते औरंगाबाद महामार्गाचेही दुपदरीकरणाचे काम मंजूर असून ते सुरू देखील आहे. मात्र हा सर्वच रस्ता चौपदरी करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
१२५ कोटीतून ही होणारी कामे
1 काँक्रीटीकरण : कालिंका माता मंदिर ते खोटेनगरपर्यंतच्या सुमारे ७.३० किमी लांबीचा सध्याचा राष्टÑीय महामार्ग क्र.६ चे काँक्रीटीकरण करण्यात येईल.
2 कालिंका माता मंदिर ते खोटेनगरपर्यंत समांतर रस्ते : कालिंका माता मंदिर ते खोटेनगर पर्यंतच्या अंतरात महामार्गाच्या दोन्ही बाजूचे समांतर रस्ते करून त्याचे डांबरीकरण करण्यात येईल.
3 तीन ठिकाणी बोगदे : या महामार्गावर रस्ता क्रॉसिंगसाठी गुजराल पेट्रोलपंप चौक, अग्रवाल हॉस्पिटल चौक व शिवकॉलनी चौक या तीन चौकात बोगदे तयार करण्यात येतील.
4 फुटपाथ व गटार : या महामार्गाच्या दोन्ही बाजूला समांतर रस्त्यांच्या लगत फूटपाथ व गटार बांधण्यात येईल.
5 मुख्य रस्ता व समांतर रस्त्यात दुभाजक : शहरातून जाणारा महामार्ग व त्याचे समांतर रस्ते यात दोन मीटरचे दुभाजक राहतील. तसेच त्यात पथदिवे असतील.