भुसावळातील १२५ कि.मी. रस्त्याचे भाग्य कधी उजाडणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 09:57 PM2020-08-19T21:57:19+5:302020-08-19T21:59:18+5:30
भुसावळ शहरातील रस्त्यांची गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अतिशय दैनावस्था झाली आहे.
उत्तम काळे
भुसावळ, जि.जळगाव : शहरातील रस्त्यांची गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अतिशय दैनावस्था झाली आहे. गेल्या आठवड्यापासून संततधार पाऊस असल्यामुळे या रस्त्यावरून चालणे जिकिरीचे झाले आहे. शहरातील १२५ किलोमीटर रस्त्यांचे भाग्य कधी उघडणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शहरात अमृत योजनेचे काम सुरू आहे. मात्र हे काम अतिशय धीम्या गतीने सुरू आहे. अमृत योजनेचे काम सुरू असल्यामुळे रस्त्यांची कामे करू नये, असा आदेश शासनाने पालिकेला दिला आहे. ह्या आदेशाचे कारण पुढे करून पालिका रस्त्यांच्या कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. शहरातील यावल-जळगाव व वरणगाव रस्ता सोडला तर एकाही रस्त्याची स्थिती चांगली राहिली नाही. यावल-जळगाव रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे, तर वरणगाव रस्त्याचे काम दोन वर्षांपूर्वीच करण्यात आले आहे. त्यामुळे या दोन रस्त्यांची स्थिती सोडली तर तब्बल ११५ किलोमीटर रस्ते उद्ध््वस्त झाले आहेत. जामनेर रस्ता मुख्य रस्ता म्हणून गणला जातो. मात्र या रस्त्याची अवस्था तर अतिशय बिकट झाली आहे.
जे काम झाले तेही निकृष्ट
दरम्यान, पालिकेतर्फे गेल्यावर्षी मामाजी टॉकीज ते पांडुरंग टॉकीजपर्यंतच्या रस्त्याचे काम करण्यात आले होते. ट्रीमिक्स पद्धतीने बनविण्यात आलेला हा रस्ता आहे. रस्त्याचे काम होताच त्यावेळी महिनाभरात उद्ध्वस्त झाला होता. अतिशय निकृष्ट दर्जाचे काम म्हणून या रस्त्याची गणना झाली होती. पालिकेने संबंधित ठेकेदाराला नोटीस देऊन या रस्त्याचे काम पुन्हा करून घेतले होते.
शहरात १२५ किलोमीटर रस्ते
शहरात सुमारे १२५ किलोमीटर थांब रस्त्ये असल्याचा अंदाज आहे. यातील यावल - जळगाव हा पाच ते सात किलोमीटर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्त केला आहे. तर भुसावळ आगारापासून राष्ट्रीय महामार्गापर्यंतचा तीन किलोमीटर लांबीचा वरणगाव रस्ता पालिकेने केला आहे. अवघे १० किलोमीटर रस्ते वगळले तर सर्वच रस्त्यांची परिस्थिती दयनीय झाली आहे.
१५ लाखांचा मुरुम गेला खड्ड्यात
गेल्या वर्षी या रस्त्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात येत होत्या. त्यामुळे पालिकेने तक्रारीचा फायदा घेऊन १५ ते २० लाख रुपयांचा मुरूम टाकून खड्डे बुजवण्याचा देखावा निर्माण केला होता. त्यावेळी 'डांबरी रस्त्याला, मुरमाचे ठिगळ' लावल्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालवणे अधिकच कठीण झाले होते.
माजी आमदारांनीही केला होता रस्ता रोको
दरम्यान, माजी आमदार संतोष चौधरी यांनी ८ जानेवारी रोजी यावल-जळगाव रस्त्यावर महात्मा गांधी पुतळ्याजवळ रस्त्यांच्या कामांसाठी रस्ता रोको आंदोलन केले होते. तब्बल ४३ मिनिटे हे आंदोलन चालले होते. यावेळी सात दिवसात रस्त्यांची कामे करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली होती, तर तहसीलदार महेंद्र देवरे यांना तेरा मागण्यांचे निवेदन दिले होते. मात्र तरीही पालिकेने दुर्लक्ष केले.
पावसाळा संपताच रस्त्यांची कामे सुरू होणार -नगराध्यक्ष
अमृत योजनेमुळे रस्त्यांची कामे सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली होती. मात्र आता अमृत योजनेचे काम बºयाच प्रमाणात झाले आहे. त्यामुळे पावसाळा संपताच शहरातील काही रस्त्यांची कामे सुरू करण्यात येतील, अशी माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दिली आहे. यासाठी पाच कोटी रुपये मंजूर असल्याचे त्यांनी सांगितले.