डॉक्टर कुटुंबाकडील १३ लाखाच्या घरफोडीचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 10:48 AM2020-06-08T10:48:17+5:302020-06-08T10:48:41+5:30
एलसीबीने केली दोघांना अटक : पावणे चार लाखाच्या रोकडसह दुचाकी हस्तगत; डॉक्टर कुटुंब होते क्वॉँरटाईन
जळगाव : कुटुंब प्रमुख डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण कुटुंब भुसावळात क्वॉरंटाईन झाल्याची संधी हेरुन बंद घराचे कुलुप तोडून झालेल्या १३ लाखाच्या धाडसी घरफोडीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी पर्दाफाश केला आहे. आकाश सुरेश मोरे (२५, रा.घोडेपीर नगर, भुसावळ) व शेख महेबूब शेख इमाम (६०,रा. दिनदयाळ नगर, भुसावळ) या दोघांकडून ३ लाख ६६ हजार ३०० रुपये रोख व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
भुसावळ शहरातील रजा नगरात डॉक्टर दाम्पत्य वास्तव्यास आहेत. २४ मे रोजी कुटुंब प्रमुख डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे त्यांना त्याच दिवशी भुसावळातील कोविड रुग्णालयात तर कुटुंबातील डॉक्टर पत्नी व मुलांना एका विद्यालयात क्वारंटाईन करण्यात आले होते.
त्यामुळे डॉक्टर दाम्पत्याच्या घराला कुलुप होते. ३१ मे रोजी डॉ. व मोठ्या मुलाचा कोरानाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने दोघांची रुग्णालयातून सुटका झाली तर लहान मुलाचा अहवाल प्रलंबित असल्याने डॉ. या मुलाजवळ थांबल्या तर मोठा मुलगा काकांकडे गेला होता.
२ जून रोजी लहान मुलाचाही अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वजण डॉ. यांच्या मोठ्या भावाच्या घरी गेले. तेथून मोठा मुलगा घरी गेला असता त्याला घराचे कुलुप उघडे, खिडकीचे लोखंडी ग्रील उचकावलेले व घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे डॉ.यांनी घरी येऊ पाहणी केली असता १० लाख ९० हजार ९०० रुपये रोख व दागिने असा १३ लाखाचा ऐवज चोरी झाल्याची खात्री झाली. याप्रकरणी डॉक्टरांची पत्नी यांच्या फिर्यादीवरुन भुसावळ बाजार पेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.
पाच जणांची टोळी,चार फरार
मिळालेल्या माहितीनुसार या पथकाने आकाश मोरे याच्या घरातूनच मुसक्या आवळल्या. घर झडतीत त्याच्याकडे २ लाख ८६ हजार ४०० रुपये व दुचाकी आढळून आली. खाकी हिसका दाखविल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली देतानाच या गुन्ह्यात शेख दाऊद शेख महेमूद, (रा.दीनदयाळ नगर) अनिस शेख रशीद ,अल्तमस शेख रशिद (रा.जाम मोहल्ला) व जहीर (रा मुस्लिम कॉलनी) यांचाही सहभाग असल्याचे सांगितले. या पाच जणांनी मिळून घरफोडी केली व बाकीचे पैसे वाटणी करुन फरार झाल्याची माहिती दिली, त्यातील दाऊद याने घरी वडीलांकडे काही रक्कम ठेवली असल्याचे त्याने चौकशी सांगितले.
त्यानुसार पथकाने आकाश याला घेऊन दाऊद याचे वडील शेख महेबूब शेख इमाम यांच्याकडे चौकशी केली, मात्र सुरुवातीला नकार देणाऱ्या इमाम यानेही खाकीच्या हिसक्यापुढे नमते घेत घराल लपवून ठेवलेले ७९ हजार ९०० रुपये काढून दिले. दरम्यान, पोलिसांनी या गुन्ह्यात इमाम यालाही आरोपी केले आहे. उर्वरित चौघांच्या शोधार्थ पथके रवाना झाली आहेत. यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचीही चौकशी सुरु आहे.
मुख्य सूत्रधारच लागला हाती
या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी बाजार पेठ पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. चोरीचा प्रकार उघड झाल्यापासून स्थानिक गुन्हे शाखेचे रणजीत जाधव व युनुस शेख भुसावळात ठाण मांडून असताना त्यांना खबºयामार्फत डॉक्टर दाम्पत्याकडील घरफोडी शहरातील पाच जणांच्या टोळीने केल्याची माहिती मिळाली. त्यातील नावे निष्पन्न केल्यानंतर आकाश सुरेश मोरे हा भुसावळातच असून त्याच्याकडे काही रोकडदेखील असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक बापू रोहम यांनी सहायक फौजदार राजेंद्र का पाटील, हवालदार अनिल इंगळे,शरीफ काझी,रमेश चौधरी, युनुस शेख, संतोष मायकल, रणजित जाधव, राजेंद्र पवार यांचे पथक नेमून तातडीने भुसावळला रवाना केले.